जळगावअपघात

ब्रेक फेल झाल्याने ट्रकने अनेक वाहनांना चिरडलेल्या अपघातातील जखमी रिक्षा चालकाचा मृत्यू

रिव्हर्स येणाऱ्या ट्रकने अनेक वाहनांना दिली होती धडक

| लोकमाध्यम न्यूज | जळगांव २३ मार्च २०२५ |

छत्रपती शिवाजीनगर उड्डाणपुलावर शनिवारी २२ मार्च रोजी दुपारी २.३० वाजता मोठा अपघात झाला. उड्डाणपुलावरून जात असलेल्या ट्रकचे अचानक ब्रेक फेल झाल्याने चालकाचे नियंत्रण सुटले आणि हा ट्रक उतारावरून मागे आला. त्यामुळे पुलाजवळ उभ्या असलेल्या तीन रिक्षांसह चार ते पाच दुचाकींना धडक दिली. या अपघातात चार जण गंभीर जखमी झाले असून, रिक्षाचालक सुरेश रूपचंद जैस्वाल (वय ५५) यांचा उपचारादरम्यान दुर्दैवी मृत्यू झाला.

मिळालेल्या माहितीनुसार, सुरत रेल्वेगेटजवळ असलेल्या मालधक्क्यावरून सिमेंट भरून (एमएच १९, सीवाय ७७४५) क्रमांकाचा ट्रक शिवाजीनगर उड्डाणपुलावरून जात होता. पुलावर काही अंतर कापल्यानंतर अचानक ट्रकचे ब्रेक फेल झाले आणि ट्रक उतारावरून मागच्या बाजूने वेगाने रिव्हर्स येऊ लागला. भरलेला ट्रक वेगात मागे येत असल्याने त्याने तीन रिक्षा आणि चार ते पाच दुचाकींना चिरडले. या अपघातात अनेक लोक जखमी झाले असून, स्थानिक नागरिकांनी तत्काळ मदतकार्य हाती घेतले.

या दुर्घटनेत राधाकृष्ण नगरातील रहिवासी आणि रिक्षाचालक सुरेश रूपचंद जैस्वाल गंभीर जखमी झाले होते. त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. या अपघातामुळे परिसरात मोठी खळबळ उडाली असून, नागरिकांनी प्रशासनाकडे रस्ते सुरक्षेच्या उपाययोजनांची मागणी केली आहे.

राधाकृष्ण नगरातील रहिवासी सुरेश रूपचंद जैस्वाल हे रिक्षा चालवून कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होते. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले आणि एक मुलगी असा परिवार आहे. त्यांच्या निधनामुळे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

स्थानिक प्रशासनाने या अपघाताची दखल घेत तपास सुरू केला असून, ट्रकचालकाला चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले आहे. पुढील तपास पोलिस करत आहेत.

पांडुरंग महाले - संपादक

पत्रकारितेत अविरत ४५ वर्षे सेवा....प्रिंट ते डिजिटल मिडिया वृत्तपत्र छायाचित्रकार,जिल्हा पत्रकार संघात युवा पत्रकार मंडळ अध्यक्ष,सह चिटणीस,जळगांव येथेअखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद अधिवेशन प्रसंगी आंतरराष्ट्रीय वृत्तपत्र प्रदर्शन प्रकल्प प्रमुख, आंतर राष्ट्रीय ख्यातीचे ज्येष्ठ पत्रकार कुलदीप नायर यांचे कडून कौतुक,रोटरॅक्ट क्लब PRO, विविध वृत्तपत्रात छायाचित्रकार, राज्य शासनाचे अधीस्विकृतीधारक छायाचित्रकार,जळगांव जिल्ह्यातील पहिले 4 कलर साप्ताहिक लोकमाध्यम सुरू केले, दैनिक देशदूत पूर्णवेळ छायाचित्रकार,जिल्हा पत्रकार संघात कार्यकारणी सदस्य,उपाध्यक्ष, शौर्य मराठी चॅनल मुख्य उपसंपादक,जिल्हा पत्रकार संघ सरचिटणीस,विद्यमान कार्याध्यक्ष, दरम्यान १९८० पासून २०२२ पर्यंत जिल्हा माहिती कार्यालयाच्या पॅनलवर स्वतंत्र व्यवसायी अधीस्विकृतीधारक छायाचित्रकार म्हणून सहकार्य... लोकमाध्यम न्युज पोर्टल & यू ट्यूब चॅनल मुख्य संपादक म्हणून कार्यरत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button