हाफ मर्डर प्रकरणातील फरार आरोपींकडून चार दुचाकी हस्तगत ; एमआयडीसी पोलिसांची कामगिरी

| लोकमाध्यम न्यूज | जळगांव १९ मार्च २०२५ |
प्रतिनिधी ;- जळगाव जिल्ह्यात वाढत्या मोटारसायकल चोरीच्या घटनांमुळे पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी, अप्पर पोलीस अधीक्षक अशोक नखाते यांच्या मार्गदर्शनानुसार आणि उपविभागीय अधिकारी संदीप गावीत यांच्या सूचनेनुसार एमआयडीसी पोलिसांनी तपास सुरू केला होता.यात तीन जणांना एमआयडीसी पोलिसांनी पकडले असून त्यांच्या कडून महागड्या चार दुचाकी हस्तगत करण्यात आल्या आहेत. दरम्यान आरोपी हे मालेगावातील गुन्ह्यात फरार असल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले.
दि. १६ मार्च २०२५ रोजी एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या पथकाने गस्त घालतांना संशयित मुबीन शाह शकील शाह (वय २०, रा. मालेगाव), दानिश शाह जहीर शाह (वय २०, रा. मालेगाव) आणिअमीर उर्फ अमिन शाह जहुन शाह (वय २२, रा. जळगाव) यांना थांबवण्याचा प्रयत्न केला. पोलिसांना पाहून ते पळू लागले, मात्र पोलिसांनी त्यांना पकडले. त्यांच्याकडील मोटारसायकलींबाबत विचारपूस केल्यावर उडवाउडवीची उत्तरे मिळाली. तांत्रिक तपासानंतर या मोटारसायकली मालेगाव शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीतून चोरी झाल्याचे निष्पन्न झाले.
आरोपींकडून पोलिसांनी बजाज विक्रांत – MH-19 CK 7697 ,हिरो स्प्लेंडर विना नंबर ,सुझुकी बर्गमन विना नंबर , हिरो एचएफ डिलक्स विना नंबर अशा मोटारसायकली जप्त करण्यात आल्या आहेत.
संशयित आरोपी हाफ मर्डर प्रकरणात फरार होते. आझाद नगर पोलीस ठाणे, मालेगाव येथे त्यांच्याविरुद्ध गुन्हा क्रमांक ४४/२०२५ अन्वये भा.दं.वि. कलम १०९, आर्म ॲक्ट ४/२५ अंतर्गत गुन्हा दाखल आहे. पोलिसांनी त्यांच्याकडून अधिक तपास सुरू केला असून, इतर मोटारसायकल चोरीचे गुन्हे शोधण्याचे काम सुरू आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी, अप्पर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, उपविभागीय अधिकारी संदीप गावीत यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संदीप पाटील , पोलीस उपनिरीक्षक चंद्रकांत धनके, पोलीस नाईक प्रदीप चौधरी, पोलीस कॉन्स्टेबल रतन गिते यांनी केली .