जामनेर दि.२२ : देशात सर्वच जनता केंद्र सरकारच्या कारभाराला कंटाळी आहे. पतंप्रधान नरेंद्र मोदी हे हुकूमशाह सारखे वागतात. या हुकूमशाही सरकारला आता जनताच घरी बसवणार आहे असा घणाघात राष्ट्रवादी काँग्रेचे अध्यक्ष व माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार यांनी केला.यावेळी जामनेर तालुक्यातून ८० हजार मताधिक्याने श्रीराम पाटील यांना विजयी करण्याचे आश्वासन उपस्थितांनी शरद पवार यांना दिले.
रावेर लोकसभा मतदार संघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार श्रीराम पाटील यांच्या प्रचारार्थ जामनेर येथे महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांच्या मेळाव्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत आयोजन करण्यात आले होते. मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी माजी विधानसभाध्यक्ष अरुण गुजराथी होते.पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांचे तुतारी वाजवून स्वागत करण्यात आले. तर यावेळी उपस्थित महाविकास आघाडीच्या पधाधिकाऱ्यानी घोषणा देत परिसर दणाणून सोडला.
व्यासपीठावर माजी मंत्री गुलाबराव देवकर, डॉ सतीश पाटील, आमदार शिरीष चौधरी, शिवसेनेचे संपर्क प्रमुख संजय सावंत, माजी खासदार ईश्वरलाल जैन, माजी आमदार अरुण पाटील, माजी आमदार संतोष चौधरी ,माजी आमदार राजीव देशमुख , महिला प्रदेशाध्यक्ष रोहिणी खडसे, जिल्हाध्यक्ष रवींद्र पाटील, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रदीप पवार, राष्ट्रवादीच्या महिला जिल्हाध्यक्ष वंदना चौधरी, हिरालाल राठोड, डी के पाटील, अजीज मलिक, जामनेर राष्ट्रवादी काँग्रेचे तालुकाध्यक्ष किशोर पाटील, शिवसेना उबाथ गट तालुकाध्यक्ष ॲड. ज्ञानेश्वर बोरसे, राष्टवादी किसन सेलचे जिल्हाध्यक्ष सोपान पाटील, राजू बोहरा वाल्मिक पाटील यांच्यासह महाविकास आघाडीतील सर्व घटक पक्षांचे मान्यवर उपस्थित होते. यावेळी मान्यवरांनी मनोगत व्यक्त केले.
माजी आमदार सांतोष चौधरींची एंट्री आणि घोषणाबाजी
मेळाव्यात भुसावळचे माजी आमदार संतोष चौधरींची एंट्री होताच उपस्थित कार्यकर्त्यांनी जोरदार शरद पवार , संतोष चौधरी यांच्या नावाची जोरदार घोषणाबाजी केली. यावेळी अधिकाधिक प्रयत्न करून श्रीराम पाटील यांना निवडून आणू असे सांगत शरद पवार यांच्या शब्दाच्या बाहेर आपण नसल्याचा निर्वाळा संतोष चौधरी यांनी दिल्यावर टाळ्यांचा कडकडाट झाला.