दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना ईडी कडून अटक
नवी दिल्ली दि.२१ : दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे संस्थापक अरविंद केजरीवाल यांना गुरुवारी रात्री ईडी कडून (सक्तवसुली संचलनालय) कडून अटक करण्यात आली आहे. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एकच खळबळ उडाली आहे. केजरीवाल यांना उत्पादन शुल्क धोरणाशी संबंधित ‘मनी लॉन्डिंग’ प्रकरणात सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) अटक केलेली आहे.
राजधानी दिल्लीतील वादग्रस्त मद्यधोरणाशी संबंधित प्रकरणात, अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) चौकशीसाठी बोलावलेले असतानाही केजरीवाल अनेकदा गैरहजर राहिले. याप्रकरणात अरविंद केजरीवाल यांना ईडीकडून नऊ वेळा समन्स बजविण्यात आले होते. परंतु केजरीवाल एकदाही चौकशीस हजर राहिले नाहीत. हाय कोर्टाने त्यांची याचिका फेटाळल्यानंतर आज २१ मार्च गुरूवारी रात्री त्यांच्यावर ईडीने अटकेची कारवाई केली.
दोन तासांच्या चौकशीनंतर ईडीने मुख्यमंत्र्यांना अटक केली. गुरुवारीच मुख्यमंत्र्यांनी हायकोर्टात याचिका दाखल केली होती, ज्यामध्ये त्यांना अटकेतून दिलासा द्यावा, असे म्हटले होते. मात्र त्यानंतर न्यायालयाने ती याचिका फेटाळून लावली होती.
मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या प्रकरणी उद्या म्हणजेच शुक्रवारी सुप्रीम कोर्टात सुनावणी होणार असल्याचे सांगण्यात येत आहे. ही याचिका खुद्द आम आदमी पक्षानेच दाखल केली आहे. मात्र तोपर्यंत मुख्यमंत्र्यांपुढील आव्हाने बरीच वाढली आहेत. सध्या लोकसभा निवडणुका जवळ आल्या आहेत, तारखाही जाहीर झाल्या आहेत, अशा परिस्थितीत ईडीची ही कारवाई महत्त्वाची आहे.
सध्या या प्रकरणावर उद्या म्हणजेच शुक्रवारी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना दिलासा द्यावा, अशी मागणी करण्यात आली आहे. या प्रकरणाची सुनावणी गुरुवारी रात्री उशिराच व्हावी अशी आम आदमी पार्टीची इच्छा होती, पण आता ही मोठी सुनावणी उद्या म्हणजेच शुक्रवारी होणार आहे.