जळगाव दि.२७ : महाराष्ट्र राज्य सहकारी पणन महासंघ म्हणजेच राज्य मार्केटींग फेडरेशनच्या व्हा.चेअरमनपदी जळगाव जिल्हा दुध संघाचे संचालक रोहित दिलीपराव निकम यांची बिनविरोध निवड झाली आहे. तर चेअरमनपदी अहमदनगर येथील दत्तात्रय पानसरे यांची निवड झाली आहे. राज्याचे विशेष सरकारी वकील ॲड.उज्ज्वल निकम यांचे रोहित निकम हे पुतणे असून सहकाराचा वारसा कायम ठेवून निकम परिवाराच्या शिरपेचात मानाचा तुरा या निवडीच्या माध्यमातून रोवला गेला आहे.
मुंबई येथील नरसी नाथ स्ट्रीट येथे ही निवड झाली. निवडणुक निर्णय अधिकारी म्हणून नितीन काळे यांनी काम पाहिले. या संस्थेवर प्रथमच भाजपाला व्हाईस चेअरमन पद रोहित निकम यांच्या रूपाने मिळालेले आहे .नाफेड व राज्य शासनाची प्रमुख अभिकर्ता संस्था म्हणून किमान आधारभुत खरेदी योजनेंतर्गत धान्य व भरड धान्य खरेदी करते. संपुर्ण महाराष्ट्रात रासायनिक खतांचा व्यवसाय देखील करते. राज्यभरात पणन महासंघाच्या मालकीचे १३५ गोदामे आहेत.
व्हा.चेअरमन रोहित निकम यांच्या मातोश्री शैलजादेवी निकम यांनी २० वर्षांपुर्वी राज्य मार्केटींग फेडरेशनच्या व्हा.चेअरमन म्हणून कामकाज पाहिलेले आहे. सलग दोन वेळा व्हा.चेअरमनपद त्यांनी भुषविले असून पुन्हा सहकारातील राजकीय इतिहासाची पुनरावृत्ती होवून रोहित निकम हे त्या पदावर विराजमान झाले आहेत.
रोहित निकम हे भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष असून त्यांनी संघटनेमध्ये देखील आपल्या कामाचा ठसा उमटवला आहे. भाजपा नेते देवेंद्र फडणवीस, गिरीश महाजन व आ.मंगेश चव्हाण यांनी या निवडणुकीत विश्वासू कार्यकर्ता म्हणून रोहित निकम यांना संधी दिली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री गुलाबराव पाटील, मंत्री गिरीश महाजन, मंत्री अनिल भाईदास पाटील , आमदार संजय सावकारे, जिल्हा बँकेचे चेअरमन संजय पवार यांनी रोहित निकम यांच्या नियुक्तीचे स्वागत केले आहे.