जळगावशैक्षणिक

रूग्ण अर्ध्यारात्री आला तरी त्याला टाळू नका – पद्मश्री डॉ.रविंद्र कोल्हे

एमबीबीएस विद्यार्थ्यांचा पदवी प्रदान सभारंभ जल्लोषात

जळगाव दि.३१: वैद्यकीय शिक्षण घेतल्यानंतर अनेकजण मुंबईला जातात. मी देखिल गेलो. आईवडीलांना वाटले मुलगा आता विदेशात जाईल. पण मला बाळंतपण आणि लहान मुलांमधील न्युमोनिया आजाराविषयी शिकायचे होते. म्हणून मी दुर्गम अशा मेळघाटात आलो. याठिकाणी कुठल्याही प्रकारच्या सुविधा नसतांना तेथे दवाखाना सुरू केला. आता तर त्या तुलनेत अनेक साधने सुविधा निर्माण झाल्या आहेत. त्यामुळे एखादा रूग्ण तुमच्याकडे अर्ध्यारात्री आला तर त्याला टाळू नका, त्याच्यावर उपचार करा असा सल्ला पद्मश्री डॉ. रवींद्र कोल्हे यांनी विद्यार्थ्यांना दिला.डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयाच्या सन २०१८ च्या बॅचच्या एमबीबीएसचा पदवी प्रदान सोहळा भावूक पण तेवढ्याच थाटात पार पडला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. रवींद्र कोल्हे बोलत होते. समारंभाच्या सुरूवातीला पद्मश्री डॉ. रवींद्र कोल्हे आणि पद्मश्री डॉ. स्मीता कोल्हे यांच्या हस्ते धन्वंतरी पूजन आणि दीपप्रज्वलन करण्यात आले. याप्रसंगी व्यासपीठावर गोदावरी परिवाराच्या आधारस्तंभ गोदावरी पाटील, फाऊंडेशनचे अध्यक्ष माजी खा. डॉ. उल्हास पाटील, सचिव डॉ. वर्षा पाटील, वैद्यकीय महाविद्यालयाचे संचालक डॉ. एन.एस. आर्विकर, डीन डॉ. प्रशांत सोळंके, रजीस्ट्रार प्रमोद भिरूड, वैद्यकीय अधीक्षक डॉ. प्रेमकुमार पंडीत हे उपस्थित होते.
पद्मश्री डॉ. रवींद्र कोल्हे यांनी पुढे बोलतांना सांगितले की, जिथे रस्ताच नाही अशा मेळघाटात वैद्यकीय सेवा सुरू केली. त्यासाठी मला माझ्या शिक्षकांचे गुरूंचे मार्गदर्शन लाभले. माझा प्रबंध सर्वोत्तम राहिल्याने बर्‍याच गोष्टी मला शिकता आल्या. तुम्ही देखिल आता वैद्यकीय पदवी घेतली आहे. पुढचा अभ्यासक्रम शिकतांना तुमचा प्रबंध सर्वोत्तम करा असा सल्लाही डॉ. रवींद्र कोल्हे यांनी दिला. पद्मश्री डॉ. स्मीता कोल्हे यांनी गोदावरी आजी यांच्यामुळे डॉ. उल्हास पाटील यांचे व्यक्तीमत्व घडल्याचे गौरवोद्गार व्यक्त केले. याप्रसंगी वैद्यकीय महाविद्यालयाचे अधीष्ठाता डॉ. प्रशांत सोळंके यांनी मार्गदर्शन केले.व्यावसायिक आणि मानवी मुल्ये जपा – डॉ. उल्हास पाटील
अध्यक्षीय भाषणात गोदावरी फाऊंडेशनचे अध्यक्ष माजी खा. डॉ. उल्हास पाटील यांनी सांगितले की, वैद्यकीय शिक्षण जरी पूर्ण झाले असले तरी ही तुमची खरी सुरूवात आहे. तुम्ही भाग्यशाली आहात तुम्हाला पुढील अभ्यासक्रमासाठी अनेक पर्याय उपलब्ध आहेत. समाजाने डॉक्टरांना देवरूप मानले आहे ही गोष्ट कायम लक्षात ठेवा. अचूक निदान आणि उपचार हे रूग्णासाठी महत्वाचे आहेत. वैद्यकीय सेवा करतांना तुमचा आत्मविश्‍वास कायम ठेवा. तसेच डॉ. कोल्हे यांनी सांगितल्याप्रमाणे तुमचे संशोधन आणि प्रबंध या दोन गोष्टींवर लक्ष केंद्रीत करा. वैद्यकीय सेवा करतांना व्यावसायिक मुल्यांसह मानवी मुल्ये जपण्याचेही काम तुम्हाला करावे लागणार असल्याचे डॉ. उल्हास पाटील यांनी सांगितले. दरम्यान २०३३ मध्ये सुपरस्पेशालिटी प्राप्त केल्यानंतर तुमच्या मातृसंस्थेला न विसरता सहकार्य करा असे आवाहनही डॉ. उल्हास पाटील यांनी केले.
विद्यार्थ्यांच्या यशाने पालकही गहिवरले.पदवीप्रदान समारंभात १०१ विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते एमबीबीएस पदवी प्रदान करण्यात आली. यावेळी उपस्थित अनेक पालकांच्या डोळ्यात पाल्याचे यश पाहून आनंदाश्रु तरळले होते. याप्रसंगी गोविंद पावरा या पालकांनी मनोगत व्यक्त केले. तसेच विद्यापीठात चारही वर्ष टॉपर ठरलेली डॉ. प्रियंका पंड्या हिच्यासह डॉ. विक्रांत गायकवाड, डॉ. संस्कृती भिरूड, डॉ. जयश्री गुंडेटी, डॉ. कुणाला कातोरे यांनी महाविद्यालयात शिक्षण घेतांनाचे त्यांचे अनुभव कथन केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन व आभार बुश्रा खान, अमित साखरे आणि खुशी सुराणा यांनी केले.

पांडुरंग महाले - संपादक

पत्रकारितेत अविरत ४५ वर्षे सेवा....प्रिंट ते डिजिटल मिडिया वृत्तपत्र छायाचित्रकार,जिल्हा पत्रकार संघात युवा पत्रकार मंडळ अध्यक्ष,सह चिटणीस,जळगांव येथेअखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद अधिवेशन प्रसंगी आंतरराष्ट्रीय वृत्तपत्र प्रदर्शन प्रकल्प प्रमुख, आंतर राष्ट्रीय ख्यातीचे ज्येष्ठ पत्रकार कुलदीप नायर यांचे कडून कौतुक,रोटरॅक्ट क्लब PRO, विविध वृत्तपत्रात छायाचित्रकार, राज्य शासनाचे अधीस्विकृतीधारक छायाचित्रकार,जळगांव जिल्ह्यातील पहिले 4 कलर साप्ताहिक लोकमाध्यम सुरू केले, दैनिक देशदूत पूर्णवेळ छायाचित्रकार,जिल्हा पत्रकार संघात कार्यकारणी सदस्य,उपाध्यक्ष, शौर्य मराठी चॅनल मुख्य उपसंपादक,जिल्हा पत्रकार संघ सरचिटणीस,विद्यमान कार्याध्यक्ष, दरम्यान १९८० पासून २०२२ पर्यंत जिल्हा माहिती कार्यालयाच्या पॅनलवर स्वतंत्र व्यवसायी अधीस्विकृतीधारक छायाचित्रकार म्हणून सहकार्य... लोकमाध्यम न्युज पोर्टल & यू ट्यूब चॅनल मुख्य संपादक म्हणून कार्यरत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button