महायुतीच्या प्रचाराचा नारळ आज फुटणार ; रवींद्र चव्हाण यांच्या जाहीर सभेतून मनपा रणसंग्रामाला प्रारंभ

| लोकमाध्यम न्युज जळगांव | दि. ४ जानेवारी २०२६ : जळगाव शहर महानगरपालिकेच्या निवडणुकीचा रणसंग्राम आता अधिकृतपणे रंगात आला असून, आज रविवार दि. ४ जानेवारी २०२६ रोजी सायंकाळी ५ वाजता पिंप्राळा येथील भवानी मंदिर परिसरातून महायुतीच्या प्रचाराचा नारळ फोडला जाणार आहे. भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष मा. आ. रविंद्र चव्हाण यांच्या हस्ते महायुतीच्या ७५ उमेदवारांच्या प्रचाराची सुरुवात करण्यात येणार असून, त्यानंतर लगेचच छत्रपती शिवाजी महाराज चौक, पिंप्राळा येथे प्रचंड जाहीर सभा आयोजित करण्यात आली आहे.
या भव्य सभेस भाजपचे ज्येष्ठ नेते व मंत्री मा. ना. गिरीशभाऊ महाजन, पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील, केंद्रीय मंत्री ना. रक्षाताई खडसे, मा. ना. संजय सावकारे, खासदार स्मिताताई वाघ, माजी मंत्री आ. अनिल पाटील, गुलाबराव देवकर, आमदार सुरेश (राजू मामा) भोळे, आ. मंगेश दादा चव्हाण,आ. चंद्रकांत सोनवणे, आ. किशोर अप्पा पाटील, आ. अमोल जावळे, आ. चंद्रकांत पाटील, आ. अमोल पाटील आदी मान्यवरांची उपस्थिती लाभणार आहे.
याशिवाय भाजप जिल्हाध्यक्ष दीपक सूर्यवंशी, शिवसेना (शिंदे गट) जिल्हाप्रमुख विष्णू भंगाळे, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) जिल्हाध्यक्ष संजय पवार, RPI आठवले गटाचे अनिल अडकमोल यांच्यासह महायुतीतील सर्व पक्षांचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि इच्छुक उमेदवार मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत.
सायंकाळी ५ वाजता भवानी मंदिर परिसरातून प्रचाराचा शुभारंभ करून त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे जाहीर सभा घेण्यात येणार असून, या सभेला महायुतीचे सर्व ७५ उमेदवार, भाजप, शिवसेना (शिंदे गट), राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) आणि RPI आठवले गटाचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन भाजप जिल्हाध्यक्ष दीपक सूर्यवंशी, शिवसेना जिल्हाप्रमुख विष्णू भंगाळे व राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष संजय पवार यांनी केले आहे.







