जळगावमहानगर

जळगाव शहरात विजेचा ताण कमी करण्यासाठी हालचालींना वेग

महापौरांचा पुढाकार; ५ नवीन सबस्टेशन उभारणीसाठी लवकरच अंतिम निर्णय

| लोकमाध्यम न्युज | जळगाव (प्रतिनिधी) दि. ५ मे : शहरातील वाढत्या विजेच्या ओव्हरलोडच्या समस्येवर तोडगा काढण्यासाठी महापौर दीपमाला काळे यांनी पुढाकार घेत सोमवारी (दि. ४ मे) महत्त्वपूर्ण बैठक घेतली. या बैठकीत शहरात प्रस्तावित असलेल्या पाच नवीन सबस्टेशन उभारणीसंदर्भात सविस्तर चर्चा करण्यात आली असून, कामांना लवकरच गती मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

बैठकीला महावितरणचे अतिरिक्त कार्यकारी अभियंता दत्तात्रय साळी, कार्यकारी अभियंता जी. टी. महाजन, अधिकारी अजय वाणी, देवेंद्र भंगाळे, चेतन सोनार तसेच महानगरपालिकेच्या विद्युत विभागाचे संदीप मोरे उपस्थित होते. यावेळी शहरातील विजेच्या समस्यांचा आढावा घेऊन त्यावर ठोस उपाययोजना करण्यावर भर देण्यात आला.

महावितरण विभागाकडून यापूर्वीच काही सबस्टेशनचे प्रस्ताव सादर करण्यात आले होते आणि त्यांना मंजुरीही मिळाली होती. मात्र, मागील प्रशासकीय कार्यकाळात या प्रस्तावांची अंमलबजावणी झाली नसल्याने नागरिकांना विजेच्या तक्रारींना सामोरे जावे लागत होते. महावितरण आणि महानगरपालिका यांच्यातील समन्वयाच्या अभावामुळे ही कामे प्रलंबित राहिल्याचेही बैठकीत स्पष्ट झाले.

या पार्श्वभूमीवर महापौरांनी पुढाकार घेत सबस्टेशन उभारणीसाठी पर्यायी जागांची यादी महापालिकेकडून सादर केली आहे. या जागांची प्रत्यक्ष पाहणी करण्यासाठी पुढील दोन दिवसांत महावितरण आणि महापालिकेचे अधिकारी संयुक्त दौरा करणार आहेत. पाहणीनंतर तातडीने अंतिम निर्णय घेण्यात येईल, असे महापौरांनी स्पष्ट केले.

शहरातील वाढत्या विजेच्या मागणीच्या पार्श्वभूमीवर ही पाच नवीन सबस्टेशन उभारणीची योजना अत्यंत महत्त्वाची ठरणार असून, यामुळे ओव्हरलोडची समस्या कमी होऊन नागरिकांना दिलासा मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

पांडुरंग महाले - संपादक

पत्रकारितेत अविरत ४५ वर्षे सेवा....प्रिंट ते डिजिटल मिडिया वृत्तपत्र छायाचित्रकार,जिल्हा पत्रकार संघात युवा पत्रकार मंडळ अध्यक्ष,सह चिटणीस,जळगांव येथेअखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद अधिवेशन प्रसंगी आंतरराष्ट्रीय वृत्तपत्र प्रदर्शन प्रकल्प प्रमुख, आंतर राष्ट्रीय ख्यातीचे ज्येष्ठ पत्रकार कुलदीप नायर यांचे कडून कौतुक,रोटरॅक्ट क्लब PRO, विविध वृत्तपत्रात छायाचित्रकार, राज्य शासनाचे अधीस्विकृतीधारक छायाचित्रकार,जळगांव जिल्ह्यातील पहिले 4 कलर साप्ताहिक लोकमाध्यम सुरू केले, दैनिक देशदूत पूर्णवेळ छायाचित्रकार,जिल्हा पत्रकार संघात कार्यकारणी सदस्य,उपाध्यक्ष, शौर्य मराठी चॅनल मुख्य उपसंपादक,जिल्हा पत्रकार संघ सरचिटणीस,विद्यमान कार्याध्यक्ष, दरम्यान १९८० पासून २०२२ पर्यंत जिल्हा माहिती कार्यालयाच्या पॅनलवर स्वतंत्र व्यवसायी अधीस्विकृतीधारक छायाचित्रकार म्हणून सहकार्य... लोकमाध्यम न्युज पोर्टल & यू ट्यूब चॅनल मुख्य संपादक म्हणून कार्यरत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button