जळगावमहानगरसामाजिक

सुंदर जळगाव’चे स्वप्न बाळगत विकासाची पंचसूत्री राबविण्याचा ध्यास…!

| लोकमाध्यम न्युज | जळगाव दि. १३ जुलै  : काही नेतृत्वे अशी असतात जी केवळ पदाने मोठी नसतात, तर त्यांच्यात असलेल्या कामाच्या तळमळीमुळे आणि संवेदनशील स्वभावामुळे ती जनमानसात अढळ स्थान निर्माण करतात. जळगाव शहर महानगरपालिकेच्या १७ व्या महापौर दीपमाला मनोज काळे हे असंच एक आश्वासक नाव! ६ फेब्रुवारी २०२६ रोजी जळगावच्या महापौरपदाची धुरा सांभाळल्यापासून त्यांनी शहराला विकासाची आणि शिस्तीची एक नवी दिशा दिली आहे. १३ जुलै रोजी त्यांच्या वाढदिवसानिमित्त, जळगावच्या या ‘प्रथम नागरिका’च्या कौतुकास्पद प्रवासावर जळगाव येथील मुक्त पत्रकार विश्वजीत चौधरी यांनी टाकलेला एक विशेष प्रकाशझोत…

राजकारणापलीकडची संवेदनशीलता: 

महापौर दीपमाला काळे यांच्या कामाची पद्धत पाहिली, तर त्यात राजकारणी नेत्यापेक्षा जळगावकरांच्या कुटुंबातील एका सदस्याची आत्मीयता जास्त दिसून येते. सामान्यांचे प्रश्न ऐकताना त्यांच्या चेहऱ्यावरील नम्रता आणि ते सोडवण्यासाठी अधिकाऱ्यांना जागच्या जागी आदेश देण्याचा त्यांचा धडाका यामुळे त्यांनी अल्पावधीतच जळगावकरांच्या मनात हक्काचे स्थान मिळवले आहे. केवळ वातानुकूलित केबिनमध्ये न बसता, रणरणत्या उन्हात आणि पावसात स्वतः रस्त्यावर उतरून अतिक्रमण निर्मूलन आणि स्वच्छतेची पाहणी करणे, ही त्यांच्या कार्यतत्परतेची साक्ष आहे.

विठ्ठल भक्ती आणि ‘फिटनेस आयकॉन’वाढदिवसाच्या अवघ्या दोन दिवस आधी, म्हणजेच ९ ते ११ जुलै २०२६ दरम्यान त्यांनी जळगाव ते पंढरपूर हा प्रवास सायकलने पूर्ण केला. माऊलींच्या चरणी सायकल वारी करण्याचे हे त्यांचे सलग दुसरे वर्ष होते. जळगावची एवढी मोठी जबाबदारी खांद्यावर असताना, सलग तीन दिवस सायकल चालवून त्यांनी दाखवलेली जिद्द केवळ थक्क करणारी नाही, तर प्रेरणादायी आहे. या सायकल वारीतून त्यांनी संपूर्ण महाराष्ट्राला ‘पर्यावरण संवर्धन’ आणि ‘सुदृढ आरोग्य’ (फिटनेस) चा एक अनोखा संदेश दिला. विठ्ठलाच्या चरणी लीन होऊन त्यांनी स्वतःसाठी काही न मागता संपूर्ण जळगावच्या सुख-समृद्धीसाठी साकडे घातले, यातच त्यांचे मोठेपण दिसून येते.

सुंदर जळगाव’चे स्वप्न आणि विकासाची पंचसूत्री

गेल्या १५० हून अधिक दिवसांच्या कारकिर्दीत त्यांनी जळगावला प्रगतीपथावर नेण्यासाठी एक स्पष्ट व्हिजन (दृष्टिकोन) ठेवला आहे.

आरोग्य व स्वच्छता : शहरातील प्रत्येक नागरिकाला उत्तम आरोग्य सुविधा मिळवून देणे आणि ‘कचरामुक्त जळगाव’साठी घंटागाड्यांच्या यंत्रणेला शिस्त लावणे.

व्यापाऱ्यांची भागीदारी : ‘माझे दुकान, माझी कचराकुंडी’ हे अभियान राबवून बाजारपेठ सुशोभित करणे.

अतिक्रमणमुक्त रस्ते : शहरातील मुख्य चौक आणि रस्ते अतिक्रमणमुक्त करून जळगावकरांची वाहतूक कोंडीतून मुक्तता करणे.

समन्वयाचे आणि सुसंस्कृत राजकारण

जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील, राज्याचे जलसंपदा व आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन, शहराचे आमदार राजूमामा भोळे उपमहापौर मनोज चौधरी, स्थायी समिती सभापती डॉ. चंद्रशेखर पाटील यांच्यासोबत उत्तम समन्वय साधत त्यांनी शहराच्या विकासकामांना गती दिली आहे. शासनाकडून कोट्यवधी रुपयांचा निधी आणून प्रलंबित अमृत पाणीपुरवठा योजना आणि सिमेंट काँक्रिटच्या रस्त्यांचे जाळे पूर्ण करण्यासाठी त्या अहोरात्र प्रयत्न करत आहेत.

असं म्हणतात की, “ध्येय ज्यांचे मोठे असते, त्यांच्या पाठीशी जनता उभी राहते.” दीपमाला काळे यांनी जळगावला राज्यातील एक आदर्श आणि स्वच्छ शहर बनवण्याचे ध्येय ठेवले आहे. त्यांच्या या स्वप्नाला जळगावकर नागरिक पूर्ण साथ देत आहेत. अशा या कार्यक्षम, अभ्यासू, संवेदनशील आणि कर्तव्यदक्ष महापौर दीपमाला काळे यांना विठू माऊली त्यांना दीर्घायुष्य, उत्तम आरोग्य लाभो आणि जळगाव शहराच्या विकासाची ही घोडदौड त्यांच्या नेतृत्वात अशीच अविरत सुरू राहो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना!

विश्वजीत द. चौधरी, मुक्त पत्रकार, जळगांव 

+91 94203 83778 / +91 92844 97705

पांडुरंग महाले - संपादक

पत्रकारितेत अविरत ४५ वर्षे सेवा....प्रिंट ते डिजिटल मिडिया वृत्तपत्र छायाचित्रकार,जिल्हा पत्रकार संघात युवा पत्रकार मंडळ अध्यक्ष,सह चिटणीस,जळगांव येथेअखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद अधिवेशन प्रसंगी आंतरराष्ट्रीय वृत्तपत्र प्रदर्शन प्रकल्प प्रमुख, आंतर राष्ट्रीय ख्यातीचे ज्येष्ठ पत्रकार कुलदीप नायर यांचे कडून कौतुक,रोटरॅक्ट क्लब PRO, विविध वृत्तपत्रात छायाचित्रकार, राज्य शासनाचे अधीस्विकृतीधारक छायाचित्रकार,जळगांव जिल्ह्यातील पहिले 4 कलर साप्ताहिक लोकमाध्यम सुरू केले, दैनिक देशदूत पूर्णवेळ छायाचित्रकार,जिल्हा पत्रकार संघात कार्यकारणी सदस्य,उपाध्यक्ष, शौर्य मराठी चॅनल मुख्य उपसंपादक,जिल्हा पत्रकार संघ सरचिटणीस,विद्यमान कार्याध्यक्ष, दरम्यान १९८० पासून २०२२ पर्यंत जिल्हा माहिती कार्यालयाच्या पॅनलवर स्वतंत्र व्यवसायी अधीस्विकृतीधारक छायाचित्रकार म्हणून सहकार्य... लोकमाध्यम न्युज पोर्टल & यू ट्यूब चॅनल मुख्य संपादक म्हणून कार्यरत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button