
ऑनलाइन फसवणूक, सोशल मीडिया सुरक्षितता आणि डिजिटल गोपनीयतेबाबत २५० विद्यार्थिनींना मार्गदर्शन
| लोकमाध्यम न्युज | जळगाव (प्रतिनिधी) दि. २३ : विद्यार्थिनींमध्ये सायबर सुरक्षेविषयी जागरूकता निर्माण करण्याच्या उद्देशाने नंदिनीबाई गर्ल्स स्कूल येथे इयत्ता ८ वी ते १० वीच्या विद्यार्थिनींसाठी सायबर सुरक्षा जनजागृती विषयावर विशेष मार्गदर्शन व चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले. दि. २२ जुलै रोजी दुपारी ३ ते ४ या वेळेत झालेल्या या सत्राला सुमारे २५० विद्यार्थिनींचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
सायबर गुन्ह्यांपासून बचावाचे दिले मार्गदर्शन 
या सत्रात प्रियदर्शनी भांडारकर आणि खुशबू लांबोळे यांनी ऑनलाइन फसवणूक, फिशिंग, विशिंग, स्मिशिंग, ओटीपी आणि पासवर्ड सुरक्षितता, मजबूत पासवर्ड तयार करण्याचे महत्त्व, द्विस्तरीय प्रमाणीकरण (2-Factor Authentication), सोशल मीडियाचा सुरक्षित वापर, बनावट लिंक व क्यूआर कोड स्कॅम, सायबर बुलिंग, डिजिटल गोपनीयता, अज्ञात व्यक्तींशी ऑनलाइन संपर्क टाळणे तसेच मोबाईल अॅप्स डाउनलोड करताना घ्यावयाची खबरदारी यासह सायबर गुन्ह्यांपासून बचावासाठी आवश्यक उपायांची सविस्तर माहिती दिली.
संवादातून वाढली जागरूकता – संवादात्मक पद्धतीने आयोजित करण्यात आलेल्या या सत्रात विद्यार्थिनींनी विविध प्रश्न विचारत सायबर सुरक्षेबाबतच्या शंकांचे निरसन करून घेतले. तसेच सुरक्षित डिजिटल जीवनशैलीचा अवलंब करण्याचा संकल्पही विद्यार्थिनींनी यावेळी केला.
शाळेचे सहकार्य – या कार्यक्रमासाठी शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. एस. एम. राणे तसेच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे मोलाचे सहकार्य लाभले.

“डिजिटल युगात सायबर सुरक्षेचे ज्ञान प्रत्येक विद्यार्थ्यापर्यंत पोहोचणे ही काळाची गरज आहे. योग्य माहिती आणि सतर्कतेमुळे अनेक सायबर गुन्हे टाळता येऊ शकतात.”
— प्रियदर्शनी मनोज भांडारकर, मार्गदर्शक






