जळगावन्यायालयीन

न्याय विश्वास फाउंडेशनच्या मोफत कायदेविषयक मार्गदर्शन शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद; असंख्य नागरिकांनी घेतला लाभ

| लोकमाध्यम न्युज | जळगाव (प्रतिनिधी) दि. २७ – : अॅडव्होकेट अनिकेत उज्ज्वल निकम संचालित ‘न्याय विश्वास फाउंडेशन’ यांच्या वतीने जळगावकरांसाठी आयोजित करण्यात आलेल्या मोफत कायदेविषयक सल्ला व मार्गदर्शन शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. नूतन मराठा महाविद्यालय, जळगाव येथील सभागृहात पार पडलेल्या या शिबिरात जळगाव जिल्ह्यातील असंख्य नागरिकांनी सहभाग नोंदवत विविध कायदेशीर विषयांवर तज्ज्ञ वकिलांकडून मार्गदर्शन घेतले.

निकम कुटुंबाला वकिली क्षेत्राची प्रदीर्घ परंपरा लाभली आहे. बॅरिस्टर निकम यांनी वकिली व्यवसायात उल्लेखनीय कार्य केले. त्यानंतर पद्मश्री अॅडव्होकेट उज्ज्वल निकम यांनी सरकारी वकील म्हणून देशभरात आपल्या कार्याचा ठसा उमटविला. त्याच परंपरेचा वारसा पुढे नेत वकिली क्षेत्रातील तिसरी पिढी असलेले अॅडव्होकेट अनिकेत उज्ज्वल निकम हे सामाजिक बांधिलकी जपत सर्वसामान्य नागरिकांना कायदेशीर मदत व मार्गदर्शन उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने हा उपक्रम राबवत आहेत.

दैनंदिन जीवनात कोर्ट-कचेरी, जमिनीचे वाद, मालमत्तेचे प्रश्न, पोलीस तक्रारी, कौटुंबिक वाद तसेच विविध कायदेशीर कागदपत्रांबाबत अनेक नागरिक संभ्रमात असतात. योग्य माहितीच्या अभावामुळे अनेकांना मानसिक, आर्थिक व कायदेशीर त्रासाला सामोरे जावे लागते. ही अडचण दूर करण्याच्या हेतूने न्याय विश्वास फाउंडेशनने अनुभवी वकिलांच्या सहभागातून हे मोफत मार्गदर्शन शिबिर आयोजित केले.

शिबिरामध्ये जमिनीचे वाद, ७/१२ उताऱ्याशी संबंधित प्रश्न, मालमत्तेचे हक्क, पती-पत्नीमधील वाद, कौटुंबिक प्रकरणे, पोलीस तक्रारी, एफआयआर, न्यायालयीन प्रक्रिया, सायबर गुन्हे, ऑनलाईन आर्थिक फसवणूक तसेच महिला, बालक व ज्येष्ठ नागरिकांचे कायदेशीर हक्क यांसह विविध विषयांवर नागरिकांना मोफत सल्ला देण्यात आला. तसेच गरजू नागरिकांना मोफत सरकारी कायदेशीर मदत कशी मिळू शकते, याबाबतही सविस्तर माहिती देण्यात आली.

सुरुवातीला अॅडव्होकेट अनिकेत निकम यानी प्रास्ताविकातून कार्यक्रम आयोजना मागची भूमिका स्पष्ट करतांना सांगितले की, न्याय विश्वास फाऊंडेशन स्थापनेमागील प्रेरणा ही लोकांच्या मनात न्यायाव्यस्थे बद्दल विश्वास आणि कायद्या बद्दलची जागृती निर्माण करण्याचा उद्देश आहे. यापुढे देखील विविध समाजोपयोगी उपक्रम राबविण्यासाठी आम्ही तत्पर राहू असेही ते यावेळी म्हणाले.

या शिबिराचा मोठ्या संख्येने नागरिकांनी लाभ घेतल्याबद्दल समाधान व्यक्त करताना न्याय विश्वास फाउंडेशन, जळगावचे अध्यक्ष अॅडव्होकेट अनिकेत निकम यांनी अशा जनहिताच्या उपक्रमांद्वारे सर्वसामान्य नागरिकांना न्यायव्यवस्थेबाबत जागरूक करण्याचे कार्य पुढेही सुरू राहील, अशी भावना देखील व्यक्त केली.

पांडुरंग महाले - संपादक

पत्रकारितेत अविरत ४५ वर्षे सेवा....प्रिंट ते डिजिटल मिडिया वृत्तपत्र छायाचित्रकार,जिल्हा पत्रकार संघात युवा पत्रकार मंडळ अध्यक्ष,सह चिटणीस,जळगांव येथेअखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद अधिवेशन प्रसंगी आंतरराष्ट्रीय वृत्तपत्र प्रदर्शन प्रकल्प प्रमुख, आंतर राष्ट्रीय ख्यातीचे ज्येष्ठ पत्रकार कुलदीप नायर यांचे कडून कौतुक,रोटरॅक्ट क्लब PRO, विविध वृत्तपत्रात छायाचित्रकार, राज्य शासनाचे अधीस्विकृतीधारक छायाचित्रकार,जळगांव जिल्ह्यातील पहिले 4 कलर साप्ताहिक लोकमाध्यम सुरू केले, दैनिक देशदूत पूर्णवेळ छायाचित्रकार,जिल्हा पत्रकार संघात कार्यकारणी सदस्य,उपाध्यक्ष, शौर्य मराठी चॅनल मुख्य उपसंपादक,जिल्हा पत्रकार संघ सरचिटणीस,विद्यमान कार्याध्यक्ष, दरम्यान १९८० पासून २०२२ पर्यंत जिल्हा माहिती कार्यालयाच्या पॅनलवर स्वतंत्र व्यवसायी अधीस्विकृतीधारक छायाचित्रकार म्हणून सहकार्य... लोकमाध्यम न्युज पोर्टल & यू ट्यूब चॅनल मुख्य संपादक म्हणून कार्यरत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button