जळगाव दि.३ जुन २०२४ : जळगाव शहारातील नाथवाडा परिसरात सिंधी कॉलनी रस्त्यावर एका इसमाचा गळा चिरून खून करण्यात आल्याची घटना सोमवारी पहाटेच्या सुमारास उघडकीस आली आहे. घटनास्थळी पोलिसांनी धाव घेत तपास सुरु केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, जळगाव शहरातील नाथ वाडा परिसरात राहणारे ललित प्रल्हाद वाणी वय-४५ हे सुप्रीम कंपनी गाडेगाव येथे कामाला आहेत. रात्री ११.४५ वाजेच्या सुमारास कामावरून ते घरी येत असताना सिंधी कॉलनी ते नाथवाडा रस्त्याने ते घरी येत होते. सोमवारी पहाटेच्या सुमारास मुख्य चौकात बांधकाम सुरू असलेल्या इमारतीच्या बाहेर वाळूवर त्यांचा मृतदेह मिळून आला.
घटनेची माहिती मिळताच एमआयडीसी पोलीस ठाण्याचे निरीक्षक बबन आव्हाड यांच्यासह पथकाने धाव घेतली. मयत ललित वाणी यांच्या पश्चात पत्नी, २ मुले असा परिवार आहे. अज्ञात इसमानी त्यांच्या गळ्यावर वार केल्याने त्यांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप गावीत हे घटनास्थळी पोहचले असून फॉरेन्सिक टीम नमुने घेत आहे.
मयताचा खून का केला, कुणी केला याचा अद्याप उलगडा झाला नसून पोलिसांनी तपासचक्रे वेगाने फिरवली आहे. मयताची बॅग रस्त्याच्या कडेला मिळून आली आहे.