
लोकमाध्यम न्युज | जळगांव दि.२८ जुलै २०२४ |
गेल्या दहा वर्षांत केंद्रात, राज्यात आणि मनपात सत्ता असूनही आ. राजुमामा भोळे यांनी जळगावच्या विकासासाठी एकाही चांगले काम केले नाही. एखादी नवीन योजना आणली नाही. एवढेच नव्हे तर जळगावची अवस्था खेड्यापेक्षाही अतिशय दयनीय झालेली आहे. रस्ते, पथदिवे, पर्यटनस्थळ यात काही विकास झालेला नाही. आमदार केवळ राष्ट्रीय महामार्गावरील रस्त्याच्या कामात टक्केवारी घेण्यात गुंतले असल्याचा गंभीर आरोप माजी विरोधी पक्षनेते सुनील महाजन यांनी पत्रकार परिषदेत केला.
पद्मालय विश्राम गृहात आयोजित या पत्रकार परिषदेत उबाठाचे महानगर अध्यक्ष शरद तायडे उपस्थित होते. सुनील महाजन पुढे म्हणाले की, डीपीडीसीच्या बैठकीत एखाद्या नगरसेवकाप्रमाणे निवडणुका बघून आयुक्त आमचे ऐकत नाही, असे ओरडणे योग्य आहे का., असा सवाल करून महाजन म्हणाले, आमदार अद्यापही नगरसेवकाच्या मानसिकतेत असून, ते आमदारांच्या भूमिकेत यायला तयार नाहीत. जळगावच्या रस्त्यांची अतिशय गाळण झाली आहे. जागोजागी खड्डे पडले आहेत. काँक्रिटीकरण, डांबरीकरण या रस्त्यांच्या कामासंदर्भात ते बोलायला तयार नाहीत. राष्ट्रीय महामार्ग, कॉलनी, प्रभागात पथदिवे बंद का आहेत. याबाबत ते गप्प आहेत. त्यांनी शहरात एकही नवीन योजना आणली नाही. असे सांगून महाजन म्हणाले ३०० कोटी रुपये गुंतवणूक करण्याकरिता एका कंपनीची जळगावला बैठक झाली. त्या बैठकीला स्वतः आ. भोळे उपस्थित होते. कंपनी सर्व खर्च करायला तयार होती. परंतु त्यांना विजपुरवठा हवा होता. तो मिळवून देण्यासाठी आमदारांनी कुठलेही प्रयत्न केले नाही. केवळ चुप्पी साधली. त्यामुळे एक चांगला उद्योग जळगावातून निघून पुण्याला गेला. जर हा उद्योग जळगावमध्ये राहिला असता तर हजारो तरुणांना रोजगार आणि कामे मिळाली असती.
आगामी विधानसभेच्या निवडणुका तोंडावर बघून आ. भोळे यांना आता रस्ते आणि विकास कामें का आठवत आहेत असा सवालही त्यांनी केला. जळगाव मनपाचे रस्ते पीडब्ल्यूडीकडे हस्तांतरीत करण्यात आले. त्याचे २० लाखाप्रमाणे तुकडे पाडून जवळच्या ठेकेदारांना टक्केवारीच्या माध्यमातून हे काम देण्यात आले. त्यामुळे रस्त्यांचे बारा वाजले. असा आरोपही महाजन यांनी केला. आता मात्र, निधीअभावी हे कामे थांबून आहेत. त्यामुळे आमदारांचा केविलवाणा प्रयत्न सुरू आहे. गेल्या १० वर्षात एखादे चांगले काम दाखवा आणि बक्षीस मिळवा असे आव्हान महाजन यांनी आ. भोळे यांना दिले.
उबाठा शिवसेना लवकरच रस्ते आणि विकास कामांवर रस्त्यावर उतरणार आणि टक्केवारी घेणार्या आ. सुरेश भोळे यांना जाब विचारणार, असा इशारा त्यांनी यावेळी दिला.
लाडक्या बहिणसाठी निधी नाही
राज्यात महाराष्ट्र मुख्यमंत्री लाडकी बहिण योजना सुरू झाली आहे. परंतु बहिणींना देण्यासाठी शासनाकडे पैसे शिल्लक नाही. असे अर्थमंत्र्यांनी सांगितले. त्यामुळे पैसा आणणार कोठून असा टोलाही महाजन यांनी लगावला.
रस्त्याचे काम निकृष्ठ काँक्रीटीकरण झाल्यामुळे त्यांची गुणवत्ता ढासळली आहे. सहा महिन्यातच रस्त्यांची दुरावस्था सुरू झाली आहे. जळगावला सक्षम लोकप्रनिधीची गरज आहे, असेही त्यांनी सांगितले.