जळगावमहापालिका निवडणुक

जळगाव शहराच्या भरघोस विकासासाठी महायुतीच्या उमेदवारांना प्रचंड मतांनी निवडून द्या : रविंद्र चव्हाण

पिंप्राळ्यात महायुतीच्या प्रचाराचा शंखनाद; १२ बिनविरोध नगरसेवकांचा सत्कार करून वचननाम्याचे प्रकाशन

लोकमाध्यम न्युज जळगांव | दि. ५ जानेवारी २०२६ : जळगावात मिळणारा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहता, शहर महानगरपालिकेत महायुतीचा विजय निश्चित आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०४७ पर्यंत ‘विकसित भारत’ घडवण्याचे स्वप्न पाहिले आहे, त्या ध्येयाकडे पाऊल टाकण्यासाठी आणि जळगावच्या सर्वांगीण प्रगतीसाठी महायुतीचे नेते कटिबद्ध आहेत. या विकासाच्या प्रवासात जळगावकरांनी भक्कम साथ द्यावी असे आवाहन भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आमदार रवींद्र चव्हाण यांनी  केले.

जळगाव शहर महानगरपालिका निवडणुकीच्या प्रचाराचा अधिकृत शुभारंभ करण्यासाठी रविवारी, ४ जानेवारी रोजी पिंप्राळा येथे रवींद्र चव्हाण यांची भव्य जाहीर सभा पार पडली. तत्पूर्वी, चव्हाण यांच्या हस्ते भवानी माता मंदिरात दर्शन घेऊन आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून प्रचाराचा नारळ फोडण्यात आला.

या जाहीर सभेच्या व्यासपीठावर ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन, माजी मंत्री संजय सावकारे, खासदार स्मिता वाघ, आमदार सुरेश (राजूमामा) भोळे, आमदार मंगेश चव्हाण, आमदार किशोर आप्पा पाटील, आमदार अमोल जावळे, राष्ट्रवादीचे माजी पालकमंत्री गुलाबराव देवकर, शिवसेना जिल्हाप्रमुख विष्णू भंगाळे, राष्ट्रवादीचे जिल्हाप्रमुख संजय पवार यांसह महायुतीचे अनेक दिग्गज नेते उपस्थित होते. याप्रसंगी महायुतीकडून बिनविरोध निवडून आलेल्या १२ नगरसेवकांचा मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला, तसेच जळगावच्या विकासाचे आश्वासन देणाऱ्या महायुतीच्या ‘वचननाम्याचे’ प्रकाशन करण्यात आले.

या सभेचे विशेष वैशिष्ट्य म्हणजे अनेक अपक्ष आणि बंडखोर उमेदवारांनी महायुतीच्या उमेदवारांना दिलेला जाहीर पाठिंबा. विशाल त्रिपाठी यांनी सूत्रसंचालनातून या पाठिंब्याची माहिती दिली. यामध्ये प्रभाग १३ ‘ब’ मध्ये सुरेखा तायडे यांना प्रिया तायडे, १० ‘ड’ मध्ये जाकीर खान पठाण यांना शेख अहमद नूर, १० ‘क’ मध्ये कविता शिवदे यांना नीलूताई इंगळे, ८ ‘क’ मध्ये भाजपचे बंडखोर विजय पाटील यांनी अमर जैन यांना, तर १६ ‘क’ मध्ये रंजना वानखेडे यांना मीनल मावळे आणि ९ ‘ड’ मध्ये डॉ. चंद्रशेखर पाटील यांना राज कोळी यांनी आपला पाठिंबा जाहीर केला.

सभेत बोलताना गुलाबराव देवकर, आमदार किशोर आप्पा पाटील आणि मंत्री गिरीश महाजन यांनी आपल्या घणाघाती भाषणातून विरोधकांचा समाचार घेत महायुतीच्या विजयाचा निर्धार व्यक्त केला. या जाहीर सभेमुळे जळगावच्या राजकीय वातावरणात मोठी चैतन्य निर्माण झाले असून महायुतीने प्रचारात आघाडी घेतली आहे. सभेचे आभार प्रदर्शन प्रदेश सरचिटणीस नितीन इंगळे यांनी केले.

पांडुरंग महाले - संपादक

पत्रकारितेत अविरत ४५ वर्षे सेवा....प्रिंट ते डिजिटल मिडिया वृत्तपत्र छायाचित्रकार,जिल्हा पत्रकार संघात युवा पत्रकार मंडळ अध्यक्ष,सह चिटणीस,जळगांव येथेअखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद अधिवेशन प्रसंगी आंतरराष्ट्रीय वृत्तपत्र प्रदर्शन प्रकल्प प्रमुख, आंतर राष्ट्रीय ख्यातीचे ज्येष्ठ पत्रकार कुलदीप नायर यांचे कडून कौतुक,रोटरॅक्ट क्लब PRO, विविध वृत्तपत्रात छायाचित्रकार, राज्य शासनाचे अधीस्विकृतीधारक छायाचित्रकार,जळगांव जिल्ह्यातील पहिले 4 कलर साप्ताहिक लोकमाध्यम सुरू केले, दैनिक देशदूत पूर्णवेळ छायाचित्रकार,जिल्हा पत्रकार संघात कार्यकारणी सदस्य,उपाध्यक्ष, शौर्य मराठी चॅनल मुख्य उपसंपादक,जिल्हा पत्रकार संघ सरचिटणीस,विद्यमान कार्याध्यक्ष, दरम्यान १९८० पासून २०२२ पर्यंत जिल्हा माहिती कार्यालयाच्या पॅनलवर स्वतंत्र व्यवसायी अधीस्विकृतीधारक छायाचित्रकार म्हणून सहकार्य... लोकमाध्यम न्युज पोर्टल & यू ट्यूब चॅनल मुख्य संपादक म्हणून कार्यरत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button