लोकमाध्यम न्युज | जळगांव दि. ८ ऑगस्ट २०२४ |
मुकादम पदाची स्थगितीच्या सुनावणीत सहायक कामगार आयुक्त यांच्याकडून बाजुने निकाल लावून देतो,असे सांगत 36 हजाराची तक्रारदाराकडून लाच स्विकारताना जळगाव माथाडी व असंरक्षित कामगार मंडळाचे कामगार निरीक्षक चंद्रकांत पाटील यांना एसीबीच्या पथकाने गुरुवार,8 रोजी रंगेहात पकडले.
तक्रारदार हे माथाडी कामगारा संघटनेचे उपाध्यक्ष व मुकादम म्हणून कार्यरत आहे. तक्रारदार यांचे मित्र हे मुकादम होते. परंतु त्यांच्या मुकादम पदाला स्थगिती देण्यात आली होती. यासंदर्भात केस सहायक कामगार आयुक्त यांच्याकडे सुनावणीसाठी होती. सहायक कामगार आयुक्त यांच्या माध्यमातून निकाल लावून देतो,त्या मोबदल्यात कामगार निरीक्षक चंद्रकांत पाटील यांनी सोमवार,5 ऑगस्ट रोजी 50 हजाराची लाचेची मागणी केली होती. यासंदर्भात येथील एसीबी कार्यालयात तक्रार प्राप्त झाली होती. या तक्रारीची पडताळणी गुरुवारी पथकाने केली असता कामगार निरीक्षक पाटील यांनी पंचासमक्ष तडजोडअंती 36 हजार रुपयांची लाच स्विकारली. त्याच वेळी पथकाने त्यांना ताब्यात घेतले. या प्रकरणी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
सापळा पथकाचे पोलीस नाईक बाळू मराठे, पोलीस नाईक सुनिल वानखेडे, राकेश दुसाणे, पोलीस नाईक किशोर महाजन यांनी सापळा पथकाची जबाबदारी पार पाडली. कारवाई मोहिम पोलीस निरीक्षक एन.एन.जाधव यांच्यासह सहायक फौजदार दिनेशसिंग पाटील,सुरेश पाटील, पोलीस हवालदार रवींद्र घुगे, महिला पोलीस हेड कॉन्सटेबल शैला धनगर, पोलीस कॉन्सटेबल प्रदीप पोळी, पोलीस कॉन्सटेबल प्रणेश ठाकुर, पोलीस कॉन्सटेबल सचिन चाटे ,अमोल सुर्यवंशी यांनी केली. नाशिक परिक्षेत्राचे पोलीस अधीक्षक शर्मिष्ठा घारगे- वालावलकर, परिक्षेत्राचे अप्पर पोलीस अधीक्षक माधव रेड्डी, नाशिक परिक्षेत्राचे वाचक पोलीस निरीक्षक स्वप्नील राजपूत यांच्या मार्गदर्शनात पथकाने सापळा यशस्वी केला.
कोणत्याही शासकीय अधिकारी किंवा कर्मचारी यांनी अथवा त्यांच्या वतीने खासगी इसमाने त्यांचे कोणतेही शासकीय काम करण्यासाठी लाचेची मागणी केल्यास तात्काळ जळगाव येथील जिल्हाधिकारी कार्यालयातील अल्प बचत भवन आवारातील लाचलूचपत प्रतिबंध विभागाशी संपर्क साधावा, असे आवाहन पोलीस निरीक्षक एन.एन. जाधव यांनी केले आहे.