निधन वार्ता

शिवसेना भाजपा युतीचे पहिले मुख्यमंत्री, बाळासाहेब ठाकरे यांचे अत्यंत विश्वासू मनोहर जोशी यांचे हृदयविकाराच्या धक्क्याने निधन

आज शुक्रवारी दुपार नंतर दादर स्मशानभूमीत पार्थिवावर अंत्यसंस्कार

मुंबई दि.२३ प्रतिनिधी – महाराष्ट्रातील शिवसेना भाजपा युतीचे पहिले मुख्यमंत्री, बाळासाहेब ठाकरे यांचे अत्यंत विश्वासू मनोहर जोशी यांचे आज शुक्रवारी पहाटे हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले. मुंबईतील हिंदुजा रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. मृत्यू समयी त्यांचे वय ८६ वर्षाचे होते. गुरुवारी त्यांना हिंदुजा रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. आज शुक्रवारी दुपार नंतर दादर स्मशान भूमीत मनोहर जोशी यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. .शिवसेनेच्या सुवर्ण काळाचे मनोहर जोशी साक्षीदार आणि शिल्पकार होते. गेल्या काही वर्षांपासून ते फारसे सक्रिय नव्हते. शिवसेना भाजपा युतीचे मुख्यमंत्रीपद भूषवित असतांनाच बाळासाहेब ठाकरेंच्या एका शब्दावर त्यांनी हे पद सोडले होते.

१९९५ मध्ये महाराष्ट्रात युतीचं सरकार पहिल्यांदा आलं. शिवसेना आणि भाजपा यांनी ती निवडणूक जिंकली. मनोहर जोशी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री होते गोपीनाथ मुंडे. शिवाजी पार्कवर अत्यंत दिमाखदार सोहळ्यात मनोहर जोशी आणि गोपीनाथ मुंडे यांचा शपथविधी सोहळा पार पडला होता. मुख्यमंत्री म्हणून मनोहर जोशी यांची कारकीर्द बहरत होती. मात्र १९९९ मध्ये मनोहर जोशींचे जावई गिरीश व्यास यांच्यावर पुण्यातल्या एका शाळेसाठी राखीव असलेल्या भूखंडाचं आरक्षण बदलल्याचा आरोप झाला. हा आरोपच मनोहर जोशींच्या गच्छंतीचं कारण ठरला.

जावयावर आरोप झाल्यानंतर मनोहर जोशींचं मुख्यमंत्रिपद जाणार या चर्चा सुरु झाल्या होत्या. बाळासाहेब ठाकरेंनी तत्कालीन कामगार मंत्री साबीरभाई शेख यांच्या हस्ते एक चिठ्ठी मनोहर जोशीं कडे पाठविली. चिठ्ठीत मजकूर साबीरभाई यांना सुध्दा माहित नव्हता. कार्यक्रमात व्यासपीठावर असलेल्या साबीरभाई यांनी बाळासाहेब ठाकरे यांची चिठ्ठी जोशीसरांकडे दिली. ‘महाराष्ट्राच्या राज्यपालांकडे राजीनामा सुपूर्द करुन मला भेटायला या’ असा मजकूर या पत्रात होता. बाळासाहेबांची आज्ञा शिरसावंद्य मानत मनोहर जोशींनी ताबडतोब राज्यपालांकडे जाऊन राजीनामा दिला आणि मातोश्रीवर बाळासाहेब ठाकरेंच्या भेटीला गेले होते.
राजीनामा दिल्यानंतरही मनोहर जोशींच्या मनात बाळासाहेब ठाकरेंबाबत कुठलाही राग नव्हता. यानंतरच्या काळात जेव्हा त्यांना याविषयी विचारणा झाली तेव्हा ते म्हणाले होते, ‘जो पद देतो त्याला ते काढण्याचा अधिकार आहे. बाळासाहेब ठाकरेंनी मला मुख्यमंत्री केलं होतं तेव्हा का केलं असं विचारलं नव्हतं. त्यामुळे त्यांनी राजीनामा देण्याचा आदेश दिला तेव्हा मी तातडीने राजीनामा दिला.’ असं मनोहर जोशींनी सांगितलं होतं.
सुरुवातीला माधूकरी, त्यानंतर मुंबईतून येऊन शिकवणी वर्ग, ‘कोहिनूर’ची स्थापना, १९७६ ला मुंबईचे महापौर, मार्च १९९० ते डिसेंबर ९१ विधानसभेचे विरोधी पक्षनेते, मार्च १९९५ ते जानेवारी १९९९ या काळात राज्याचे मुख्यमंत्री, ऑक्टोबर ९९ ते मे २००२ केंद्रात तत्कालीन प्रधानमंत्री अटलबिहारी वाजपेयी सरकारमध्ये केंद्रीय अवजड उद्योग मंत्री, मे २००२ ते ऑगस्ट २००४ लोकसभेचे अध्यक्ष असा त्यांचा चढता प्रवास राहिला आहे.

पांडुरंग महाले - संपादक

पत्रकारितेत अविरत ४५ वर्षे सेवा....प्रिंट ते डिजिटल मिडिया वृत्तपत्र छायाचित्रकार,जिल्हा पत्रकार संघात युवा पत्रकार मंडळ अध्यक्ष,सह चिटणीस,जळगांव येथेअखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद अधिवेशन प्रसंगी आंतरराष्ट्रीय वृत्तपत्र प्रदर्शन प्रकल्प प्रमुख, आंतर राष्ट्रीय ख्यातीचे ज्येष्ठ पत्रकार कुलदीप नायर यांचे कडून कौतुक,रोटरॅक्ट क्लब PRO, विविध वृत्तपत्रात छायाचित्रकार, राज्य शासनाचे अधीस्विकृतीधारक छायाचित्रकार,जळगांव जिल्ह्यातील पहिले 4 कलर साप्ताहिक लोकमाध्यम सुरू केले, दैनिक देशदूत पूर्णवेळ छायाचित्रकार,जिल्हा पत्रकार संघात कार्यकारणी सदस्य,उपाध्यक्ष, शौर्य मराठी चॅनल मुख्य उपसंपादक,जिल्हा पत्रकार संघ सरचिटणीस,विद्यमान कार्याध्यक्ष, दरम्यान १९८० पासून २०२२ पर्यंत जिल्हा माहिती कार्यालयाच्या पॅनलवर स्वतंत्र व्यवसायी अधीस्विकृतीधारक छायाचित्रकार म्हणून सहकार्य... लोकमाध्यम न्युज पोर्टल & यू ट्यूब चॅनल मुख्य संपादक म्हणून कार्यरत

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button