महिला आयोग आपल्या दारी : 19 सप्टेंबर रोजी जळगाव येथे आयोजन
महिला आयोगाच्या अध्यक्ष, श्रीमती रुपाली चाकणकर यांची प्रमुख उपस्थिती
लोकमाध्यम न्युज | जळगाव १३ सप्टेंबर २०२४ |
जिल्ह्यातील समस्याग्रस्त व पिडीत महिलांना त्यांचे म्हणणे मांडण्याकरीता “महिला आयोग आपल्या दारी” या उपक्रम महाराष्ट्र राज्य महिला आयोग यांच्यामार्फत राबविण्यात येत आहे. सदर कार्यक्रम गुरुवार, दिनांक 19 सप्टेंबर रोजी सकाळी 10.00 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनात महिला आयोगाच्या अध्यक्ष, श्रीमती रुपाली चाकणकर प्रमुख उपस्थितीत होणार आहे.
या जनसुनावणीस तक्रारदार पिडीत महिलेला स्थानिक पातळीवर तात्काळ मदत व्हावी यासाठी कोणतीही पिडीत महिला पूर्व सुचना न देता सुध्दा थेट सुनावणीस उपस्थित राहून आपली लेखी समस्या आयोगापुढे मांडू शकेल. तसेच पोलीस विभागाकडील महिला व मुलांकरीता असलेल्या सहाय्य कक्षाकडे प्राप्त असलेली प्रकरणेही सदर जनसुनावणीत ठेवण्यात येणार आहेत. सदर जनसुनावणीत विधीसेवा प्राधिकरण, संरक्षण अधिकारी, पोलीस विभाग यांचेकडून तात्काळ सेवा उपलब्ध करून देण्यात येतील.
जळगांव जिल्ह्यातील सर्व तक्रारदार पिडीत महिलांनी आपल्या समस्या लेखी स्वरूपात घेवून जनसुनवणीस उपस्थित रहावे. अधिक माहितीसाठी जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालय, मध्यवर्ती प्रशासकीय इमारत, आकाशवाणी जवळ, जळगांव यांच्या कार्यालयात संपर्क साधावा, (दुरध्वनी क्र. ०२५७-२२२८८२८) असे आवाहन वनिता सोनगत, जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी यांनी केले आहे.