लोकमाध्यम न्युज | जळगाव ३ ऑक्टोबर २०२४ |
येथील जी.एम. फाउंडेशन, आमदार राजूमामा भोळे, शिवगंध व पेशवा ढोलपथक यांच्यावतीने शहरातील शिवतीर्थ येथे नवरात्रोत्सवाचे दि. ३ ते १२ ऑक्टोबरदरम्यान आयोजन करण्यात आले आहे. तरुणाईने मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.
गुरुवार दि. ३ ऑक्टोबर पासून शारदीय नवरात्र उत्सवाचे आयोजन शहरात विविध ठिकाणी करण्यात आले आहे. तरुणाईला प्रोत्साहन म्हणून जी.एम.फाउंडेशन, आ. राजूमामा भोळे यांच्या वतीने तसेच शिवगंध व पेशवा ढोल पथक यांच्या सहकार्याने शिवतीर्थ मैदानावर नवरात्र उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. नवरात्रोत्सवात मुंबई येथील रीदमॅटिक हिरोज बँड (ऑर्केस्ट्रा), भव्य दिव्य लाईट शो, प्रशस्त प्रेक्षक गॅलरी, भव्य मंडप याची सुविधा असून महिलांसाठी सुरक्षेची व्यवस्था करण्यात आली आहे.
उत्सवाची तयारी पूर्ण झाली असून आमदार राजूमामा भोळे यांनी शिवतीर्थ मैदानावर जाऊन व्यवस्थेची पाहणी केली. त्यानुसार विविध सूचना केल्या. नवरात्रोत्सव संध्याकाळी ७ ते रात्री १० वाजेपर्यंत सुरू राहणार आहे. उत्सवामध्ये दांडिया किंग, दांडिया क्वीन, गरबा किंग, गरबा क्वीन असे विजेते निवडण्यात येणार असून याशिवाय इतर आकर्षक बक्षिसे दिले जाणार आहेत. त्यासाठी उत्सवाची पास ही आरक्षित करावी लागणार असून तरुणाईने मोठ्या संख्येने उत्सवामध्ये सहभाग घ्यावा. अधिक माहितीसाठी (८८८८२८००९२, ८८५५००७९६४) संपर्क करावा असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.