
लोकमाध्यम न्युज | जळगाव १५ ऑक्टोबर २०२४ |
जळगाव महानगरपालिका सेवा प्रवेश नियमावली 2024 ला राज्य शासनाने अखेर मंजुरी दिली आहे. त्यामुळे आता महापालिकेत नियमित भरती करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. यासाठी आमदार सुरेश भोळे यांनी शासनाकडे सातत्याने पाठपुरावा केला होता. त्यांच्या या पाठपुराव्यास यश आले आहे.
जळगाव शहर महानगरपालिकेत विविध विभागातील अधिकारी व कर्मचारी सेवानिवृत्त होत आहेत. त्यांच्या रिक्त होणाऱ्या जागेवर नविन पद भरती नसल्याने उर्वरीत अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कामाचा ताण येत होता. महापालिकेचा कर्मचारी भरतीचा आकृतीबंध शासनाने यापुर्वीच मंजुर केला होता. मात्र सेवा प्रवेश नियमावलीस मान्यता मिळाली नसल्याने भरती होऊ शकली नाही.
आमदार भोळेंचा पाठपुरावा
सेवा प्रवेश नियमावलीस मान्यमा मिळण्यासाठी आमदार सुरेश भोळे यांनी जिल्ह्यातील तिन्ही मंत्र्यांसह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सातत्याते पाठपुरावा केला होता. त्यास अखेरीस यश आले असून शासनाने या सेवा प्रवेश नियमावलीस मान्यता दिली आहे. त्यामुळे भरतीचा महत्वाचा विषय मार्गी लागणार आहे.
आता होणार भरती
जळगाव महानगरपालिका सेवा (सेवा प्रवेश व सेवांचे वर्गीकरण) नियम 2024” यांस मान्यता देण्यात आलेली आहे. या मंजुरीमुळे जळगाव शहर महानगरपालिकेतील कर्मचारी भरतीचा मार्ग मोकळा झाला आहे. जळगाव शहर महानगरपालिकेतील कर्मचाऱ्यांची कमतरतेमुळे नागरिकांच्या कामकाजात होणारी दिरंगाई, हा प्रश्न महानगरपालिकेतील रिक्त पदे भरती झाल्यामुळे मार्गी लागणार आहे.
शहराच्या विकासासाठी सेवा प्रवेश नियम मंजुरीसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मंत्री गिरीश महाजन, पालकमंत्री गुलाबराव पाटील, उपमुख्यमंत्री अजित पवार, मंत्री अनिल पाटील यांच्या सहकार्यामुळे यास मंजुरी मिळाली असल्याचेे आमदार सुरेश भोळे यांनी मंत्रीव्दयींचे आभार मानले आहे.