
| लोकमाध्यम न्यूज | जळगांव १० मार्च २०२५ |
गेटच्या ग्रीलमध्ये अडकलेले चार वर्षाच्या मुलीचे डोके नागरिकांच्या सतर्कतेने व केलेल्या प्रयत्नाने मोकळे झाले. यासाठी मनपाच्या अग्निशमन विभागाला कळविल्यानंतर ते तात्काळ पोहचले परंतु तोपर्यत मुलीचे अडकलेले डोके निघाले होते.
एमआयडीसीतील अजिंठा फार्मसी जवळील केके कॅन च्या बाजूला चार वर्षाची राशी राहुल पाटील ही तीच्या भावासोबत घराजवळील गेटजवळ खेळत होती. तीचे आईवडील बाहेर गेले होते. तर सुरक्षा रक्षकही त्याच्या जागेवर बसलेले होते. खेळता खेळता राशीने गेटच्या ग्रीलमध्ये डोके घातले खरे पण ते अडकले. तीने डोके मोकळे करण्याचा प्रयत्न केला पण ते शक्य झाले नाही. त्यामुळे ती रडायला लागली. तीचे रडणे ऐकून शेजारील हर्षल सपकाळे यांनी तेथे येत पाहणी केली. तोपर्यत पानटपरी चालकाने तीचे डोके काढण्याचा प्रयत्न केला. हर्षल सपकाळे यांनी १०१ या क्रमांकावर फोन केला. परंतु तो कोणी उचलला नाही. अखेरीस त्यांनी महापालिकेच्या अग्निशमन विभागाला फोन लावला.
नागरिकांच्या सर्तकतेने झाला बचाव
अग्निशमन विभागाला फोन केल्यानंतर विभागातील कर्मचाऱ्यांने त्यांना धिर देत प्रथम त्या मुलीला पाणी व सरबत पिण्यास देण्याचे सांगितले. तीला धीर द्या, रडू देवू नका तोपर्यंत आम्ही पोहचतो असे सांगत ते वाहन घेवून निघाले. त्यानुसार नागरिकांनी रडणाऱ्या राशीला धीर देत पाणी पाजले. अग्निशमनचे वाहन येईपर्यत तेथे बरीच गर्दी झाली . नागरिकांनी लोखंडी पाईप घेवून ग्रील वाकवले तर काहींनी मुलीचे अडकलेले डोके धरून सुखरूप बाहेर काढले. त्याचवेळी मुलीचे आजोबा सुनील पाटील हेही तेथे पोहचले. त्यांनी नातीला जवळ घेत धिर दिला.