शरद पवार साहेबांनी मला ग्रीन सिग्नल दिला : संतोष चौधरी
भुसावळात जंगी स्वागत, हजारो समर्थकांनी केली गर्दी
जळगाव दि २० : रावेर लोकसभा मतदार संघातून राष्ट्रवादी काँग्रेस महा विकास आघाडीकडून उमेदवारी निश्चित झाल्यानंतर माजी आ.संतोष चौधरी पहिल्यांदाच बुधवारी भुसावळला आले. रेल्वेस्थानकावर आगमन होताच हजारो समर्थकांनी ढोल ताशांच्या गजरात फटाके फोडून त्यांचे जंगी स्वागत करण्यात केले. भुसावळ रेल्वे स्थानकाबाहेर येताच संतोष चौधरी यांनी छत्रपती शिवाजी महाराज, ताजोद्दिन बाबा दर्गा आणि डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केले. यानंतर भुसावळ शहरातून वाजत गाजत ते आपल्या घरी पोहचले.
रावेर लोकसभा मतदार संघाची जागा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटासाठी राखीव झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटातर्फे रावेर लोकसभेसाठी माजी आ.संतोष चौधरी यांचे नाव निश्चित झाले असून अधिकृत घोषणा उद्या गुरुवारी होणार आहे. संतोष चौधरी यांचे बुधवारी दुपारी १२.३० वाजता भुसावळ रेल्वे स्थानकावर आले असता हजारो समर्थकांनी वाजत गाजत त्यांचे स्वागत केले. रेल्वे स्थानकाबाहेर फटाके फोडून उमेदवारी निश्चित झाल्याने जल्लोष करण्यात आला.
भुसावळ रेल्वे स्थानकाबाहेर आल्यावर संतोष चौधरी यांनी पत्नी रेखा चौधरी यांच्यासह छत्रपती शिवाजी महाराज, ताजोद्दिन बाबा दर्गा आणि डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केले. भुसावळ शहरातून वाजत गाजत संतोष चौधरी घरी पोहचले. मिरवणुकीत ठिकठिकाणी शाल, श्रीफळ, हार, पुष्पगुच्छ देत नागरिकांनी त्यांचे स्वागत करून शुभेच्छा दिल्या. मिरवणुकीत प्रहार पक्षाचे उत्तर महाराष्ट्र जिल्हाध्यक्ष अनिल चौधरी, शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे गटाचे शहराध्यक्ष दीपक धांडे, काँग्रसचे जिल्हाध्यक्ष मुन्नवर खान, प्रहारचे विनोद निकम, जनाधारचे गटनेते उल्हास पगारे, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे जिल्हाध्यक्ष संगीता भारंबे, शहराध्यक्ष दुर्गेश ठाकूर, कृऊबा माजी सभापती सचिन चौधरी यांच्यासह रावेर लोकसभा मतदार संघातील प्रत्येक तालुक्यातील समर्थक आणि कार्यकर्त्यांनी सहभाग घेतला.
स्वगृही संतोष चौधरी यांचे कुटुंबियांनी औक्षण केले. त्यानंतर त्यांनी आपल्या कार्यालयात सर्व समर्थकांशी चर्चा केली.
विरोधकच मला सहकार्य करतील : संतोष चौधरी
शरद पवार साहेबांनी मला ग्रीन सिग्नल दिला असून उद्या नावे जाहीर झाल्यानंतर दौरा सुरू होईल. रावेरची जागा आपल्याला जिंकायची आहे. आम्ही सर्व आपल्या जिवाचे रान करू आणि कोणत्याही परिस्थितीत मोठ्या मताधिक्याने विजयी होऊ. गेल्या १० वर्षात भुसावळ आणि रावेर लोकसभा मतदार संघात विकास रखडला आहे. पहिल्यांदाच भुसावळ शहराला लोकसभेची उमेदवारी मिळणार असल्याने शहरात एकतर्फी मतदान होईल असा आम्हाला विश्वास आहे. खडसे परिवार आमच्या सोबत आहे त्यामुळे चिंता करण्याचे काम नाही. आम्ही जेव्हा लढतो तेव्हा जोरदार आणि सर्व शक्तिनिशी लढतो. कार्यकर्त्यांची शक्ती ज्यांच्या मागे असते त्यांना कोणतीही अडचण येत नाही. सर्वांच्या मेहनतीने आणि कार्यकर्त्यांच्या भरवशावर आम्ही निवडून येऊ. मी लढवय्या असून त्यामुळेच शरद पवारांनी मला शब्द दिला आहे. १० वर्षात जे झाले नाही ते मी १ वर्षात करून दाखवेल हे पंचक्रोशीतील जनतेला माहिती आहे. विद्यमान खासदारांच्या कामावर जनता समाधानी नसून विरोधकच मला मदत करतील असा माझा विश्वास आहे. पूर्वी एकनाथराव खडसे आणि माझे पक्षीय मतभेद होते परंतु आता आम्ही एका पक्षात असून ते मला मदत करतील. पक्षाच्या आदेशानुसार ते आम्हाला सहकार्य करतील. कोणालाही उमेदवारी जाहीर झाली तरी मी त्याच जोमाने काम करेल, असे माजी आ.संतोष चौधरी यांनी सांगितले.