लोकमाध्यम न्युज | जळगांव दि.१८ जुलै २०२४ |
येथील त्वष्टा तांबट समाज विकास मंडळ जळगांव तर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा नुकताच पांझरा पोळ गौशाळा,नेरीनाका ,जळगांव येथे संपन्न झाला.
कार्यक्रमाच्या सुरवातीला भगवान विश्वकर्मा आणि आदिशक्ती मातेचे प्रतिमा पूजन व दीपप्रज्वलन करण्यात आले. तद्नंतर अतिथी मान्यवरांचा शाल, श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
प्रास्ताविकात कार्यक्रमाचा उद्देश व समाज राबवित असलेल्या विविध उपक्रमांची माहिती देण्यात आली. कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी भुसावळ येथील शिक्षक कैलास तांबट यांनी विद्यार्थ्यांशी सुसंवाद साधला तसेच प्रा.ज्ञानेश्वर तांबट,फैजपूर यांनी शास्त्र विषय संदर्भात मार्गदर्शन केले त्यानंतर अशोक तांबट(नाशिक) यांनी समाजाच्या कार्यक्रमाचे कौतुक केले.
चंद्रशेखर कासार यांनी आपल्या मनोगतातून समाज संघटन, विद्यार्थी व पालक संवाद, मोबाईल चा अतिरेक धोकादायक, स्पर्धात्मक युग, आई वडील आणि मुलं यामधील सुसंवाद याची कशी सांगड असावी यासह विविध विषयांवर उदाहरणे देऊन स्पष्टीकरण केले. गुणवंत विद्यार्थ्यांना समाजाकडून मिळालेली कौतुकाची थाप मोलाची असते, असे मत व्यक्त केले. विद्यार्थ्यांना भावी जीवनात यशस्वी कसे व्हावे याचा मूलमंत्र दिला.तसेच स्पर्धेत टिकून रहायचं असेल तर विद्यार्थांनी चौकस राहिलं पाहिजे असं मत कासार सरांनी मांडले.
कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणून त्वष्टा तांबट समाजाचे अध्यक्ष कैलास तांबट उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते केजी सेक्शन पासून ते उच्च शिक्षण घेऊन यश संपादन केलेल्या सर्व गुणवंत विद्यार्थ्यांना भेटवस्तू, प्रशस्तीपत्र आणि गुलाबपुष्प देऊन गौरविण्यात आले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी त्वष्टा तांबट समाज विकास मंडळाच्या सर्व सदस्यांनी तसेच महिला मंडळाने परिश्रम घेतले.विद्यार्थी – विद्यार्थिनी, पालक व समाज बांधवांची लक्षणीय उपस्थिती होती. सूत्रसंचालन निलेश तांबट यांनी केले.विदयार्थी जय तांबट यांनी आभार प्रदर्शन केले.