लोकमाध्यम न्युज | जळगांव दि. ४ ऑगस्ट २०२४ |
प्रत्येक जीव सुखाची आकांक्षा ठेवतो तर दु:ख ही त्यासर्वांसाठी प्रतिकूल वाटतात. परंतु सुख काय आहे. ते दोन प्रकारचे आहे क्षणिक आणि अनंत. यात क्षणिक सुखाचा संसारिक जीवनात सुखी असल्याचा आभास होतो ते सुख नाही यात सुखाचा अंत किंवा सुखी असलेल्यांचा अंत निश्चित आहे. मात्र अनंत सुख हे शाश्वत आहे. ते प्राप्तीचा प्रत्येकाचा उद्देश असावा, असे शासनदीपक परमपुज्य श्री सुमतिमुनिजी महाराज साहेब यांनी धर्मसभेमध्ये संबोधित केले.
सुखासाठी दु:ख सहन करावे लागते. संघर्षाशिवाय यश प्राप्त होत नाही. ‘प्रत्येकाला सुख हवे असते, दुःख कोणालाच नको असते, पण पावसाशिवाय इंद्रधनुष्य होऊ शकत नाही.’ या उक्ती प्रमाणे सुख दुःखाची अनुभूती घ्यावी. ९९ सोन्याची दागिने असताना १०० होण्यासाठी एक कमी आहे यासाठी आपण दुखी होतो. शेजाऱ्याच्याकडे जास्त आहे. त्याचे आपल्याला दु:ख आहे. ९९ च्या फेऱ्यातून निघाले तर ८४ योनीचे फेरे आपले वाचतील हे लक्षात ठेवले पाहिजे. ‘जे प्राप्त आहे तेच पर्याप्त आहे.’ असे मनोमन समजले पाहिजे. जीवनभर आपली मुट्ठी भरण्यासाठी प्रयत्न केले जातात परंतू सर्वांना खाली मुट्ठी सोबत जायचे आहे. अनंत काळाच्या सुखासाठी आत्म पुरुषार्थ करा, यातूनच सुखाची प्राप्ति होते. कारण सुख मनाची आंतरिक अवस्था असते.
अनंत उपकारी तीर्थंकर भगवंतांच्या उपदेशांना समजून क्रोध, लोभ, मान आणि माया या विकारांपासून मुक्त झाले पाहिजे. यातूनच आत्मोद्धाराचा मार्ग सापडतो. या चारही बाबींवर विजय मिळविण्यासाठी शारिरीक शक्ती पेक्षा आत्मशक्ती आवश्यक आहे. यावर चिंतन जरुरी आहे. क्रोधापासून अशांतता, मान पासून अहंकार, माया पासून चंचलता आणि लोभापासून आपण आपल्याला विसरत जातो. लहान-लहान पापांपासून वाचले तर त्याचे मोठे सकारात्मक परिणाम होतात. असे आरंभी परमपूज्य ऋजुप्रज्ञमुनिजी म. सा. यांनी सांगितले.
(स्वाध्याय भवन, जळगाव – दि. ०४/०८/२०२४)