जळगावकृषी

शेतीचे अत्याधुनिक तंत्रज्ञान पुरविण्यासाठी जैन इरिगेशन व जम्मू-काश्मीर कृषी विद्यापीठात करार

सामंजस्य  कराराच्या प्रती हस्तांतरण करताना शेर-ए-काश्मीर कृषी विद्यापीठाचे कुलगुरू नजीर अहमद गनई, जैन इरिगेशनचे सहव्यवस्थापकीय संचालक अजित जैन व दोन्ही संस्थांचे सहकारी.

लोकमाध्यम न्युज | जळगाव १६ सप्टेंबर २०२४ |

जम्मू काश्मीर प्रांतातील शेतकऱ्यांना आधुनिक शेतीचे ‘हायटेक’तंत्रज्ञान पुरविण्यासंबंधी जळगावची जैन इरिगेशन कंपनी आणि जम्मू-काश्मीर मधील ‘शेर-ए-काश्मिर कृषिशास्त्र व तंत्रज्ञान विद्यापीठ’ यांच्यात सहकार्याचा करार झाला आहे.

जळगावच्या जैन हिल्सवर नुकत्याच झालेल्या या करारावर कंपनीतर्फे सह-व्यवस्थापकीय संचालक अजित जैन यांनी तर विद्यापीठातर्फे कुलगुरू प्रा.नझीर अहमद गनाई यांनी सह्या केल्या आहेत.आधुनिक पद्धती व तंत्र वापरून विविध पिकांचे उत्कृष्टरितीने उत्पादन कसे घ्यायचे,जागतिक तापमान वाढ व हवामान बदल या समस्यांचा प्रभावीपणे सामना कसा करायचा आणि आवश्यक तेवढीच संसाधने वापरून उत्पादन व उत्पादकता कशी वाढवायची यासंबंधीचे मार्गदर्शन करण्याबरोबरच जैन कंपनीने जम्मू-काश्मीरमधील शेतकऱ्यांना ऊतीसंवर्धन (टिश्यूकल्चर) व जैव तंत्रज्ञानाचा (बायोटेक्नॉलॉजी) वापर करून तयार केलेले उत्कृष्ट प्रतीचे, उच्च दर्ज्याचे, रोगविरहीत व व्हायरसमुक्त लागवडीचे साहित्य पुरवायचे आहे. तसेच शेती क्षेत्रातील शाश्वतता कायम राखण्यासाठी पाणी व्यवस्थापनाचे आधुनिक तंत्रज्ञान व त्यासाठी वापरली जाणारी साधने आणि जम्मू-काश्मीरमधील शेतकऱ्यांना आज भेडसावत असलेल्या समस्यांची कायमस्वरूपी सोडवणूक करण्याच्या दृष्टीने जैन कंपनीने
मार्गदर्शन करावयाचे आहे. तसे करारात नमूद केले आहे.
याप्रसंगी बोलताना जम्मू-काश्मीर कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नझीर अहमद गनाई म्हणाले की, “सफरचंद, केशर आणि काळेजिरे या पिकांच्या संशोधन व उत्पादन वाढीसंबंधी जैन इरिगेशनने आम्हांला मार्गदर्शन करावे अशी आमची अपेक्षा आहे.सफरचंदाची जम्मू-काश्मीरची उत्पादकता हेक्टरी १० टनाची, हिमाचलची ८ ते ९ टनाची तर पश्चिमात्य देशांची ६७ टनांची आहे. आपली उत्पादकता कमी असल्याने उत्पादन खर्च वाढतो व निर्यातीला मर्यादा येतात. जैन कंपनीशी करार केल्यामुळे जे आधुनिक संशोधन व तंत्रज्ञान आणि नाविन्यपूर्ण पद्धती उपलब्ध होणार आहेत त्या शेतकऱ्यांपर्यंत
पोहोचविल्यामुळे निश्चितच उत्पादन व उत्पादकतेत वाढ होईल, पाणी वापरात बचत होईल आणि विभागातील अन्नधान्य सुरक्षिततेला त्यामुळे हातभार लागून शेतकऱ्यांची
आर्थिक उन्नती होण्यास मदत होईल.

या सहकार्य करारावरती भाष्य करताना कंपनीचे सह-व्यवस्थापकीय संचालक अजित जैन म्हणाले की, “जम्मू-काश्मीरमधील शेतकऱ्यांच्या उन्नती व प्रगतीसाठी होत
असलेल्या या कराराचा आम्हांला अभिमान आहे. जैन इरिगेशनचे संस्थापक अध्यक्ष आणि आमचे परमपूज्य पिताजी भवरलाल जैन यांनी आयुष्यभर सर्वसामान्य, गोरगरीब व छोट्या शेतकऱ्यांच्या कल्याणाचा विचार करून त्या दिशेने संशोधन व तंत्रज्ञान विकसीत केले. ते
आज देशभरातील सर्व शेतकऱ्यांना अत्यंत उपयुक्त व मार्गदर्शक ठरत आहे. सिंचनासाठी लागणाऱ्या उत्कृष्ट दर्ज्याच्या साहित्याबरोबरच स्वच्छ, शुद्ध व रोगमुक्त दर्जेदार रोपे-कलमे व लागवडीचे अन्य साहित्य आणि अचूक व परिपूर्ण शेतीसाठी (प्रिसीजन फार्मिंगसाठी) लागणारे तंत्रज्ञान आम्ही कृषी विद्यापीठ व शेतकऱ्यांना पुरविणार आहोत. त्यामुळे त्या प्रांतातील कमीत कमी संसाधनांचा वापर होऊन अधिकाधिक उत्पादन शाश्वतरितीने वाढू शकेल. “सहकार्य कराराचा एक भाग म्हणून कृषी विद्यापीठातील विद्यार्थी व जम्मू- काश्मीरमधील शेतकऱ्यांना जळगाव येथे बोलावून प्रशिक्षण देण्यात येईल. विविध विषयांचे ८ ते १५ दिवसांचे कोर्सेस त्यांच्यासाठी चालविण्यात येतील. तसेच जैन इरिगेशनमधील अनुभवी व तज्ज्ञ लोक जम्मू-काश्मीर विद्यापीठात जाऊन तेथील विद्यार्थ्यांना अध्यापनाद्वारे मार्गदर्शन करतील”, असेही अजित जैन म्हणाले.

ठिबक सिंचनावर भाताचे पीक घेण्याचा प्रयोग मागील वीस वर्षांपासून आम्ही जळगाव व अन्य ठिकाणी राबवित आहोत.
हा प्रयोग जम्मू-काश्मीरमध्येही राबवावा. त्यासाठी आम्ही संपूर्ण सहकार्य करू, असेही .जैन यांनी कुलगुरुंना सांगितले.

 

पांडुरंग महाले - संपादक

पत्रकारितेत अविरत ४५ वर्षे सेवा....प्रिंट ते डिजिटल मिडिया वृत्तपत्र छायाचित्रकार,जिल्हा पत्रकार संघात युवा पत्रकार मंडळ अध्यक्ष,सह चिटणीस,जळगांव येथेअखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद अधिवेशन प्रसंगी आंतरराष्ट्रीय वृत्तपत्र प्रदर्शन प्रकल्प प्रमुख, आंतर राष्ट्रीय ख्यातीचे ज्येष्ठ पत्रकार कुलदीप नायर यांचे कडून कौतुक,रोटरॅक्ट क्लब PRO, विविध वृत्तपत्रात छायाचित्रकार, राज्य शासनाचे अधीस्विकृतीधारक छायाचित्रकार,जळगांव जिल्ह्यातील पहिले 4 कलर साप्ताहिक लोकमाध्यम सुरू केले, दैनिक देशदूत पूर्णवेळ छायाचित्रकार,जिल्हा पत्रकार संघात कार्यकारणी सदस्य,उपाध्यक्ष, शौर्य मराठी चॅनल मुख्य उपसंपादक,जिल्हा पत्रकार संघ सरचिटणीस,विद्यमान कार्याध्यक्ष, दरम्यान १९८० पासून २०२२ पर्यंत जिल्हा माहिती कार्यालयाच्या पॅनलवर स्वतंत्र व्यवसायी अधीस्विकृतीधारक छायाचित्रकार म्हणून सहकार्य... लोकमाध्यम न्युज पोर्टल & यू ट्यूब चॅनल मुख्य संपादक म्हणून कार्यरत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button