लोकमाध्यम न्युज | जळगांव ३१ डिसेंबर २०२४ |
हिंदू धर्मात गंधाला खूप महत्त्व आहे. शास्त्रानुसार नित्यनियमाने गंध लावणे सज्जन, सुसंस्कृत मनुष्याची ओळख आहे. प्रत्येक हिंदूने कपाळावर गंध लावला पाहिजे, जो गंध लावत नाही तो हिंदू नाही, असे कथा व्यास हभप डॉ. विशालशास्त्री गुरुबा यांनी सांगितले.
संगीतमय भागवत कथेत सोमवारी गोविंदा आला रे आला.. मच गया शोर सारी नागरी रे.. गोविंद बोलो हरी गोपाल बोलो अशा विविध भजनांनी दहीहंडी उत्सव मोठ्या उत्साहात पार पाडला. यावेळी बाळ गोपाळ कृष्णाने आपल्या सवंगड्यासोबत दहीहंडी फोडली. या सोहळ्यात सामील होण्यासाठी मोठ्या संख्येने भाविक उपस्थित होते.
विवाहासाठी कुंडलीत गुण नाही जुळले तर चालेल, पण दोघांचे मने जुळणे पाहिजे. सर्वांचा पती परमेश्वर आहे. असे डॉ.गूरुबा यांनी आपल्या मधुर वाणीतून सांगितले.
यावेळी श्री कृष्ण आणि रुख्मिणीचा मोठ्या थाटामाटात विवाह सोहळा पार पडला. या विवाहात वधूचे मामा शरद तायडे तर वराचे मामा डॉ. निलेश चांडक होते. या विवाह सोहळ्यात जुने जळगाव येथील ग्रामस्थ सहभागी झाले होते.
तरुण कुढापा मंडळातर्फे जुने जळगावातील मनपा शाळा क्रमांक ३, पांजरापोळ येथे २५ डिसेंबरपासून संगीतमय श्रीमद् भागवत कथेचे आयोजन करण्यात आले आहे.
यावेळी कथा मंडप फुलांनी सजविण्यात आलेला होता. कथेत बाळ गोपाळ कृष्णाचे अनेक प्रसंगांचे त्यांनी आपल्या सुमधुर वाणीतून वर्णन केले. गोपाळ कृष्ण कथेत पोहचल्यावर भाविकांनी त्याच्यावर पुष्पवृष्टी केली.
यांच्या हस्ते झाली महाआरती
कथेनंतर कॅन्सररोग तज्ञ डॉ.निलेश चांडक, डॉ. अमित भंगाळे, डॉ. नेहा भंगाळे, शिवसेना महानगर प्रमुख शरद तायडे, हरीश कोल्हे, प्रशांत सुरळकर, मुन्ना मराठे यांच्या हस्ते महाआरती करण्यात आली. यावेळी श्रोते भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आज भव्य शोभायात्रेचे आयोजन
कथेच्या सातव्या दिवशी कथा दुपारी १ ते २ या वेळेत होत असून त्यात सुदाम चरित्र सांगण्यात येईल. कथेची सांगता होऊन गावातून भव्य अशी शोभायात्रा काढण्यात येणार आहे. या शोभायात्रेत ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन तरुण कुढापा मंडळातर्फे करण्यात आले आहे. नंतर बुधवारी गोपाळ काल्याचे किर्तन आणि महाप्रसादाचे वाटप होणार आहे.