जळगाव दि.२१ : बालरंगभूमी विषयक विविध उपक्रमांची संख्या, व्याप्ती व दर्जा उंचावून बालरंगभूमी सकस व समृद्ध करण्यासाठी प्रयत्न करणे.शालेय शिक्षकांना नाट्यप्रशिक्षण देणे.बालनाट्य, किशोरनाट्य व कुमारनाट्य सादरीकरणासाठी आवश्यक ते प्रयत्न करण्यासाठी स्थापन झालेल्या बालरंगभूमी परिषदेतर्फे नटराजपूजन करून दि.२० मार्च जागतिक बालरंगभूमी दिवस साजरा करण्यात आला.
पी.व्ही.आर. व्यापारी संकुलातील भरारी फाऊंडेशनच्या सभागृहात झालेल्या या नटराज पूजनाच्या कार्यक्रमप्रसंगी ज्येष्ठ पत्रकार व बालरंग मासिकाच्या संपादिका अस्मिता गुरव यांच्यासह बालरंगभूमी परिषदेचे अध्यक्ष योगेश शुक्ल, मुख्य कार्यवाह विनोद ढगे, कार्यकारिणीतील आकाश बाविस्कर, सचिन महाजन, दिपक महाजन, नेहा पवार, हर्षल पवार, दुर्गेश आंबेकर, नाना सोनवणे आदींसह बालरंगभूमी परिषदेचे सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.
प्रास्ताविक करताना योगेश शुक्ल यांनी सांगितले की, बालरंगभूमी हा उत्तम अभिनेता किंवा अभिनेत्री घडविण्याचा पाया आहे. हा पाया लहान वयातच पक्का करून घेतला तर पुढे व्यावसायिक रंगभूमी, चित्रपट किंवा दूरचित्रवाहिन्यांवरील मालिकांसाठी कसदार अभिनय करणारे चांगले कलाकार मिळू शकतात. नाटक, चित्रपट किंवा दूरचित्रवाहिन्यांवरील मालिकांमध्ये आघाडीवर असलेल्या अनेक कलाकारांची सुरुवात बालरंगभूमीपासूनच झाली आहे. जळगाव शहरातीलही बालरंगभूमीवर कार्यरत असलेले अनुपमा ताकमोगे, मेघा धाडे, समीर देशपांडे, अभिषेक देशमुख, अमृता देशमुख आदी कलावंत आज मुंबईत कार्यरत आहेत. येत्या काळात बालरंगभूमी परिषदेकडून विविध उपक्रम राबविण्यात येणार असून, यात बालनाट्य शिबिरांसह, विविध विषयांवरील कार्यशाळा व स्पर्धांचे आयोजन करण्यात येणार असल्याचे सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मुख्य कार्यवाह विनोद ढगे यांनी तर आभार आकाश बाविस्कर यांनी मानले.