जळगावसामाजिकसांस्कृतिक

दीपावली पर्वावर आकाशातून अवतरली ‘सप्तज्योत’ : ३२ फुटांचा भव्य ‘लामण दिवा’; सात ज्योतींतून समृद्धीचा संदेश

भवरलाल अँड कांताबाई जैन फाऊंडेशनच्या माध्यमातून साकारलेली कलाकृती

| लोकमाध्यम News | जळगाव – अंधार दूर करण्यासाठी केवळ एक दिवा पुरेसा नसतो, तर प्रत्येकाच्या आयुष्यात आशेची, विश्वासाची आणि प्रगतीची ज्योत पेटणे आवश्यक असते. कुणाच्या आयुष्यात संघर्षाचा अंधार असतो, कुणाच्या वाट्याला परिस्थितीचे चटके असतात, तर कुणी स्वप्नांच्या पूर्ततेसाठी अहोरात्र धडपडत असतो. अशा प्रत्येकाच्या जीवनात समृद्धीचा प्रकाश पोहोचावा, या उदात्त भावनेतून जळगावच्या काव्यरत्नावली चौकात आकाशातून अवतरल्याचा भास निर्माण करणारा तब्बल ३२ फुटांचा भव्य ‘लामण दिवा’ उभारण्यात आला आहे. भवरलाल अॅण्ड कांताबाई जैन फाऊंडेशनच्या माध्यमातून साकारलेली ही कलाकृती केवळ दीपोत्सवाची सजावट नसून, मानवी जीवनाला सात दिशांनी प्रकाशमान करण्याचा एक सुंदर विचार आहे.भारतीय संस्कृतीत ‘दीप’ याला केवळ प्रकाशाचे साधन मानले जात नाही. तर तो ज्ञान, मांगल्य, समृद्धी आणि सकारात्मकतेचे प्रतीक आहे. याच परंपरेला आधुनिक कलात्मकतेची जोड देत साकारलेल्या या लामण दिव्याला सात ज्योतींचे कोंदण लाभले आहे. आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक, आरोग्य, सांस्कृतिक, संरक्षण आणि धार्मिक अशा जीवनाच्या सात महत्त्वपूर्ण अंगांना या ‘सप्तज्योतीं’ मधून प्रतीकात्मक स्वरूप देण्यात आले आहे. प्रत्येकाच्या आयुष्यात या सातही क्षेत्रांमध्ये भरभराट व्हावी, हाच या संकल्पनेमागील मूलभूत विचार आहे.

या दिव्याचे वैशिष्ट्य म्हणजे त्याचा ‘बंध आकाशाशी, नातं भूमीशी’ जोडणारं आहे. नाजूक दोऱ्यांमध्ये गुंफलेला हा भव्य दिवा जणू आकाशातून देवत्वाचा आशीर्वाद घेऊन पृथ्वीवर अवतरला आहे, असे दृश्य पाहणाऱ्याच्या मनात उभे राहते. त्याचा बंध आकाशाशी असला, तरी त्याचे नाते मात्र मातीशी आहे. माणसाने स्वप्ने आकाशाएवढी मोठी पाहावीत; मात्र त्या स्वप्नांना बळ मिळावे ते आपल्या मातीतून, आपल्या कष्टातून आणि आपल्या संस्कारांतून, असा अर्थही या कलाकृतीतून व्यक्त होतो.

या ‘सप्तज्योतीं’ मधील प्रत्येक ज्योत जवळपास सहा फुटांपेक्षाही मोठी आहे. मानवी अंतःकरणातील भावना, आशा, आकांक्षा आणि संवेदनशीलतेचे प्रतिबिंब या ज्योतींतून व्यक्त होते. संपूर्ण दिव्याला दिलेला सोनेरी रंग हा संपन्नता, ऐश्वर्य आणि मांगल्याचे प्रतीक ठरतो. सुमारे ८०० किलो वजनाची आणि ३२ फूट उंचीची ही भव्य कलाकृती काव्यरत्नावली चौकाच्या सौंदर्यात वेगळीच भर घालत आहे.

जैन इरिगेशन सिस्टीम्स लि.चे अध्यक्ष अशोक जैन यांच्या संकल्पनेतून आणि मार्गदर्शनाखाली या लामण दिव्याची निर्मिती करण्यात आली आहे. गेल्या महिनाभरापासून जैन इरिगेशनच्या कला विभागातील विजय जैन, डेव्हलपमेंट विभागातील अनिल पाटील, चंद्रशेखर विरपणकर आणि त्यांच्या २० सहकाऱ्यांनी या कलाकृतीसाठी विशेष परिश्रम घेतले. दिव्याच्या सजावटीसाठी राजेश नाईक यांचेही महत्त्वपूर्ण योगदान लाभले.

जळगावकरांचे वैभव वाढो या मंगल भावनेतून‘ लामण दिवा’ – अशोक जैन

प्रकाशाचा उत्सव साजरा करताना दुसऱ्याच्या आयुष्यातही प्रकाश निर्माण करण्याची जाणीव जागृत व्हावी, हा या लामण दिव्याचा खरा संदेश आहे. कारण दिवा स्वतः जळतो, तेव्हाच परिसर उजळतो. त्याचप्रमाणे समाजातील प्रत्येक घटकाच्या आयुष्यात प्रगतीची ज्योत पेटविण्यासाठी संवेदना, सहकार्य आणि समर्पणाची गरज असते. जळगावकरांच्या जीवनात सुख, समाधान आणि सर्वांगीण वैभव नांदो, या मंगल भावनेतून काव्यरत्नावली चौकात उभारलेला हा ‘लामण दिवा’ दीपोत्सवाला एक वेगळीच वैचारिक आणि कलात्मक उंची देत आहे.

पांडुरंग महाले - संपादक

पत्रकारितेत अविरत ४५ वर्षे सेवा....प्रिंट ते डिजिटल मिडिया वृत्तपत्र छायाचित्रकार,जिल्हा पत्रकार संघात युवा पत्रकार मंडळ अध्यक्ष,सह चिटणीस,जळगांव येथेअखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद अधिवेशन प्रसंगी आंतरराष्ट्रीय वृत्तपत्र प्रदर्शन प्रकल्प प्रमुख, आंतर राष्ट्रीय ख्यातीचे ज्येष्ठ पत्रकार कुलदीप नायर यांचे कडून कौतुक,रोटरॅक्ट क्लब PRO, विविध वृत्तपत्रात छायाचित्रकार, राज्य शासनाचे अधीस्विकृतीधारक छायाचित्रकार,जळगांव जिल्ह्यातील पहिले 4 कलर साप्ताहिक लोकमाध्यम सुरू केले, दैनिक देशदूत पूर्णवेळ छायाचित्रकार,जिल्हा पत्रकार संघात कार्यकारणी सदस्य,उपाध्यक्ष, शौर्य मराठी चॅनल मुख्य उपसंपादक,जिल्हा पत्रकार संघ सरचिटणीस,विद्यमान कार्याध्यक्ष, दरम्यान १९८० पासून २०२२ पर्यंत जिल्हा माहिती कार्यालयाच्या पॅनलवर स्वतंत्र व्यवसायी अधीस्विकृतीधारक छायाचित्रकार म्हणून सहकार्य... लोकमाध्यम न्युज पोर्टल & यू ट्यूब चॅनल मुख्य संपादक म्हणून कार्यरत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button