लोकमाध्यम न्युज | जळगांव दि. ४ ऑगस्ट २०२४ |
आषाढी अमावस्या ही दिव्याची अवस म्हणूनही ओळखली जाते. आषाढी अमावस्येला घरातील सर्व दिवे स्वच्छ करावेत व समई लावून तिची पूजा करावयाची असते. दिवा हा अग्नीचे किंवा तेजाचे एक रूप आहे. रत्नांच्या दिव्याची तुलना एके ठिकाणी संस्कृत सुभाषितकाराने उत्तम पुरुष व सज्जनांशी केली आहे तो म्हणतो- ज्याप्रमाणे रत्नाचा दिवा (रत्नदीप), स्नेह (तेल), पात्र (भांडे), दशान्तर (वात) यांची अपेक्षा करीत नाही त्याप्रमाणे सज्जनलोकसुद्धा दुसऱ्याला मदत करताना स्नेह (प्रेम), पात्र (योग्यता), दशान्तर (आपले परकेपण) यांची पर्वा करीत नाही.
महात्म्य
दीपाचे महात्म्य कालिका पुराणात सांगितले आहे. ते असे- भगवान शंकर पार्वतीला म्हणतात,
दीपामुळे लोकांवर जय मिळविता येतो दीप हा तेजोमय आहे. तो धर्म, अर्थ, काम व मोक्षप्रद आहे म्हणून हे प्रिये, दीप प्रज्वलीत करावा. दीपदान हे पुण्यप्रद कर्म मानले आहे. कार्तिक मासात भगवान विष्णूं समोर दिवा लावल्यास तुलादानाचे पुण्य मिळते. दीपाविषयक नित्य कर्म म्हणजे घरात देवाजवळ व अंगणात तुळाशीजवळ सांजवात लावणे. बहुतेक सुसंस्कृत कुटुंबात स्त्रियाच हे करतात. आषाढी अमावस्येला कणकेचे, तांदळाच्या उकडीचे किंवा बाजरीच्या पिठाचे दिवे करून त्यांची पूजा करतात. दीप किंवा दीपज्योत हे बुद्धीचे, ज्ञानाचे प्रतीक मानले जाते. कारण ज्ञान हे अज्ञानाचा अंध:कार दूर करून आत्मज्ञानाला प्रकाशित करते.
द्वारकाधीश दिगंबर जोशी ५७, विवेकानंद नगर, जळगाव